Pratap Sarnaik News: मीरा–भाईंदर शहराच्या जलपुरवठ्याशी संबंधित सूर्या उपसा जलयोजना (टप्पा–२) मध्ये दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला तांत्रिक अडथळा दूर करण्यात आला असून, मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदर महानगरपालिकेला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक यांनी याबाबत मंत्रालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत संबंधित अधिकार्यांसोबत विस्तृत चर्चा केली. सूर्या जलयोजनेतील पंप यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक असलेला वीजदाब उपलब्ध न झाल्याने पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यास अडथळा येत होता. महापारेषणने सूर्या जलयोजनेसाठी १३२ केव्ही उच्च-दाब वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यास तांत्रिक संमती दिली आहे. हा वीजपुरवठा दिवा मार्गे नव्याने तयार करण्यात येणाऱ्या १३२ केव्ही पारेषण प्रणालीद्वारे मिळणार आहे.
मीरा–भाईंदर शहराला नियोजित, स्थिर आणि वाढीव जलपुरवठा
या नव्या वीजपुरवठ्यामुळे पंपांची कार्यक्षमता १००% होईल, योजनेंतील २१८ लाख लिटर (MLD) पाणी पूर्ण क्षमतेने उचलणे शक्य होईल. तसेच मीरा–भाईंदर शहराला नियोजित, स्थिर आणि वाढीव जलपुरवठा मिळणार आहे. नव्या पारेषण लाईन व ट्रान्सफॉर्मरची उभारणी सध्या वेगाने सुरू असून, सर्व कामे मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. उर्वरित कामे मार्च २०२६ अखेर पूर्ण करण्यात येणार आहेत.
दरम्यान, नवीन वीजपुरवठा यंत्रणा सुरू झाल्यानंतर मीरा–भाईंदरचा जल पुरवठा नियमित, सुरळीत आणि शहराच्या वाढत्या गरजेस अनुरूप राहणार आहे. शहराच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सूर्या जलयोजना अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी नमूद केले.