इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केल्या प्रतकरणी प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पोलीस कोठडीमध्ये त्याची सध्या कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, प्रशांत कोरटकर याच्यावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असून, कोरटकरला अटक झाली तेव्हा त्याच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी होते, असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. मात्र भाजपाकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. तसेच भाजपाने या प्रकरणी तक्रारही केली आहे.
या प्रकरणी भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना अतुल लोंढे म्हणाले की, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार प्रतिक पडवेकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी प्रशांच कोरटकरसोबत होते. त्यांना जेव्हा अटक झाली तेव्हा ती अटक त्यांच्यासोबत झाली. कोरटकरसोबत कोल्हापूरचे पोलीस त्यांना घेऊन गेले. पण त्यांना का लपवून ठेवलंय, त्यांना का दाखवत नाहीत? तसेच कोरटकरला खरी मदत कोण करत होतं, हे का समोर येत नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आमच्याकडे आलेली माहिती खरी आहे की खोटी हे आता गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनी सांगावं, असं आव्हान अतुल लोंढे यांनी दिले.
होय, मी फोन केला होता; प्रशांत कोरटकर याची कबुली, रात्रीत पाच तास कसून चौकशी
दरम्यान, अतुल लोंढे यांनी केलेले आरोप भाजपाने फेटाळून लावले आहे. लोंढे यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस हे २०१४ पासून २०१९ पर्यंत मुख्यमंत्री असताना, २०१९ पासून विरोधी पक्षनेते असताना, त्यानंतर उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आता २०२४ मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयामध्ये प्रतिक पडवेकर नावाचा कुठलाही कर्मचारी काम करत नव्हता आणि आताही करत नाही. त्यामुळे काँग्रेसचं खोटारडेपणाचं जे वैशिष्ट्य आहे तेच या वक्तव्यामधून अतुल लोंढे यांनी सिद्ध केलं आहे.