महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 08:20 IST2025-03-26T08:20:02+5:302025-03-26T08:20:36+5:30
संतप्त शिवप्रेमींची निदर्शने; हल्ल्याचा प्रयत्न, आवाजाचे नमुने घेण्यास परवानगी

महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी
कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करीत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणारा प्रशांत मुरलीधर कोरटकर (वय ५०, रा. बेसा परिसर, नागपूर) याची तीन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी झाली. तेलंगणातून अटक केल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी त्याला मंगळवारी (दि. २५) चौथे दिवाणी सहकनिष्ठ न्यायाधीश एस. एस. तट यांच्यासमोर हजर केले. पडताळणीसाठी त्याच्या आवाजाचे नमुने घेण्याची परवानगी न्यायाधीशांनी पोलिसांना दिली. दरम्यान, संतप्त शिवप्रेमींनी जुना राजवाडा पोलिस ठाण्याबाहेर आणि न्यायालयाच्या आवारात कोरटकर याला कोल्हापुरी चप्पल दाखवत त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला.
तेलंगणा राज्यातील मंचरियाल येथून सोमवारी अटक केलेला संशयित आरोपी प्रशांत कोरटकर याला घेऊन पोलिसांचे पथक मंगळवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला काही वेळ जुना राजवाडा पोलिस ठाण्यात ठेवले. संतप्त शिवप्रेमींनी जुना राजवाडा पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात त्याला न्यायालयात हजर केले. न्यायाधीश एस. एस. तट यांच्यासमोर दुपारी सव्वाबाराच्या सुमारास सुनावणी झाली.
तपास अधिकारी संतोष गळवे यांनी सुरुवातीला आरोपीच्या अटकेची माहिती देऊन सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. सरकारी वकील सूर्यकांत पवार आणि फिर्यादी सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी जोरदार युक्तिवाद करून पोलिस कोठडीची गरज स्पष्ट केली. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचे दाखले देण्यात आले. संशयित कोरटकर याच्या वतीने ॲड. सौरभ घाग यांनी पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद केला.
डेटा कुणाच्या सांगण्यावरून नष्ट केला?
कोरटकरने कोणाच्या सांगण्यावरून मोबाइलमधील डेटा नष्ट केला? त्यावेळी त्याच्यासोबत कोण होते? पसार काळात त्याला कोणी मदत केली? पळून जाण्यासाठी कोणती वाहने वापरली? जातीय भावना भडकविण्यामागील त्याचा उद्देश काय? याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडी गरजेची आहे. त्याच्यावर दाखल असलेल्या कलमांनुसार सात वर्षांच्या आतील शिक्षेची तरतूद असली, तरी गुन्ह्यांचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकील ॲड. सूर्यकांत पवार यांनी केली.
कडेकोट बंदोबस्त, हल्ल्याचा प्रयत्न
कोरटकरला न्यायालयात हजर करण्यापूर्वी जुना राजवाडा पोलिस ठाणे, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आणि न्यायालय परिसरात प्रचंड बंदोबस्त तैनात केला होता. शिवप्रेमींनी जुना राजवाडा पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने करून कोरटकरला घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर चिल्लर फेकली. न्यायालयाच्या आवारात दबा धरून बसलेल्या काही शिवप्रेमींनी कोल्हापुरी चप्पल दाखवत त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि शिवप्रेमींची झटापट झाली. याप्रकरणी पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले.
वाचवणाऱ्यांचा शोध घ्या
कोणत्यातरी यंत्रणेची मदत असल्याशिवाय कोरटकर महिनाभर लपून राहू शकत नाही. पोलिसांनी संबंधित यंत्रणेचा शोध घ्यावा. त्याच्या घाणेरड्या वक्तव्यांनी व्यथित झालेले लोक राग व्यक्त करीत आहेत, अशी भावना फिर्यादी सावंत यांनी व्यक्त केली. यावेळी सावंत यांच्यासह दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, शाहीर दिलीप सावंत, तसेच काही महिलांनीही न्यायालयात हजेरी लावली.
पुढील तपासासाठी कोरटकरसह पाच जणांच्या आवाजाचे नमुने घ्यावे लागतील. महाराष्ट्रद्रोही वक्तव्ये करून त्याने राजमाता जिजाऊंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आहेत. याबाबत त्याला कोणाची फूस होती काय, याचाही तपास करावा लागेल. त्यासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी कमीच पडेल.
-ॲड. असीम सरोदे, फिर्यादीचे वकील
भारतीय न्याय संहिता कलम ३५-३ नुसार कोरटकर यांना पोलिसांनी नोटीस पाठवली नाही. त्यांनी मोबाइल पोलिसांकडे जमा केला आहे. आवाजाचे नमुने देण्यासाठी कधीही हजर राहू शकतो, असा अर्ज त्यांनी ४ मार्चला नागपूर न्यायालयात दिला आहे. त्यामुळे पोलिस कोठडीची गरज नाही.
-ॲड. सौरभ घाग, कोरटकरचे वकील