'हिंदुत्वा'वरून प्रकाश महाजन यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात; "राजकारणात भूमिका बदलल्या पाहिजेत, पण.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 14:13 IST2025-11-18T14:12:17+5:302025-11-18T14:13:00+5:30
तुमच्यासमोर रामायणावर कुणी टीका करतेय ते ऐकून घेताय, तुम्ही वक्फ बोर्डाचं समर्थन करता, संघात एक कार्यकर्ता जातो, तुम्ही त्याचा जाहीर बैठकीत अपमान करता, ही सवय बरोबर नाही असं सांगत प्रकाश महाजनांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर घणाघात केला.

'हिंदुत्वा'वरून प्रकाश महाजन यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात; "राजकारणात भूमिका बदलल्या पाहिजेत, पण.."
धाराशिव - मी सामान्य हिंदू माणूस आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि त्याचा वारसा राज ठाकरेंनी चालवावा ही माझी २००८ पासूनची मागणी आहे. परंतु त्यांनी अंगावरची हिंदुत्वाची शाल का काढून टाकली माहिती नाही. तुम्ही तुमचा मूळ बेस विसरला तर स्पेसमध्ये किती दिवस राहणार? मी महाराष्ट्रात राहतो, मराठी म्हणून मला अभिमान आहे परंतु मी हिंदू विचार केला तर इतर प्रांतात राहणारे, इतर भाषा बोलणारेही हिंदू आहेत ही भावना जोपासली पाहिजे. हिंदुत्वाच्या बाबतीत दृष्टीकोन वाढवला पाहिजे असं मला वाटत होते असं सांगत प्रकाश महाजन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका केली आहे.
प्रकाश महाजन म्हणाले की, हिंदुत्वात काही गोष्टी कमी आहेत, त्या सुधारल्या पाहिजे. हिंदू सनातनी धर्म असा आहे ज्यात वेळोवेळी सुधारणा होत गेली. मी स्वत: कुंभ मेळ्यात जाऊन आंघोळ केली, मला काहीही त्रास झाला नाही. मन शुद्ध असेल तर प्रत्येक गोष्ट शुद्ध दिसते. ५० कोटी लोक फक्त भारतातले नाही तर परदेशातीलही होते, ते महाकुंभला आले होते. गंगा शुद्ध झाली पाहिजे तर होय झाली पाहिजे. नरेंद्र मोदी आल्यापासून जगाचा हिंदुत्वाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. काशी विश्वेवर आज बदलले आहे. लोकांमध्ये धार्मिक भावना वाढली आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच बीडमधील महिला मुस्लीम बोलते, रामायण दाखवण्यापेक्षा संविधान दाखवा, हे बाळासाहेब ठाकरेंचा सुपुत्र तिथे बसून ऐकतो. त्यापेक्षा एकनाथ शिंदे काय वाईट आहेत? ते हिंदुत्वाचा वारसा घेऊन पुढे चाललेत. मी इतके दिवस त्यांच्यावर आक्षेप घेत होतो, त्यांनी अशा प्रकारे पक्ष चोरला म्हणून...पण खरेच आहे. वारसच असे असतील तर पर्याय काय? तुमच्यासमोर रामायणावर कुणी टीका करतेय ते ऐकून घेताय, तुम्ही वक्फ बोर्डाचं समर्थन करता, संघात एक कार्यकर्ता जातो, तुम्ही त्याचा जाहीर बैठकीत अपमान करता, ही सवय बरोबर नाही असं सांगत प्रकाश महाजनांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर घणाघात केला.
दरम्यान, आम्ही हिंदुत्वासाठी मनसेत गेलो होतो. भाजपाचं हिंदुत्व अंगावरचं कपड्यासारखे आहे, राज ठाकरेंचं हिंदुत्व अंगावर चिटकलेल्या त्वचेसारखे आहे ही मी व्याख्या केली होती. मी राज ठाकरेंमध्ये तसा नेता पाहिला आहे. महापालिकेत सत्ता येण्यासाठी बहुदा राज ठाकरेंनी हिंदुत्वाबाबत मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येते. मनसेच्या लोकप्रियतेचा उच्चांक मशिदीवरील भोंग्याचा प्रश्न आम्ही हाती घेतला तेव्हा वाढला होता, मात्र आजही भोंगे सुरू आहेत, परंतु आंदोलन कुठे चालू नाही. राजकारणात भूमिका बदलल्या पाहिजे, पण काही मते स्थायी असली पाहिजे. हा बदल होताना दिसला त्याचे वाईट वाटले. मला त्यांच्याकडून अपेक्षा होती, मी फक्त बोलून दाखवली असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.