देशाचे रूपांतर तुरुंगात होऊ देणार नाही- प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 06:47 IST2020-01-08T01:08:13+5:302020-01-08T06:47:07+5:30
नागरिकत्व सुधारणा कायदा राबवून देशाला तुरुंग बनवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे.

देशाचे रूपांतर तुरुंगात होऊ देणार नाही- प्रकाश आंबेडकर
मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा राबवून देशाला तुरुंग बनवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. मात्र आम्ही हे कदापिही होऊ देणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड्. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. नागपाडा दोन टाकी येथे जामिया काद्रिया अश्रफिया मदरशामध्ये मौलानांशी संवाद साधल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी मदरशाचे प्रमुख मौलाना मोईनुद्दीन अश्रफ, रझा अकादमीचे प्रमुख मौलाना सईद नुरी, सर्फराज आरजू उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले, मोदी-शहांनी कितीही प्रयत्न केले तरी या कायद्याची अंमलबजावणी होऊ दिली जाणार नाही. आम्ही नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे सादर करणार नाही. सरकारी कागदपत्रांमध्ये येथील नागरिकांचे वास्तव्याचे पुरावे आहेत, त्यासाठी वेगळी कागदपत्रे दिली जाणार नाहीत, असे त्यांनी ठणकावले. या लढ्यासाठी दलित, मुस्लीम, ओबीसी यांनी एकत्र येऊन दीर्घकालीन लढा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. हिंदू धर्मातील अनेक जातीजमातींना या कायद्याचा फटका बसण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. मोईनुद्दीन अश्रफ यांनी हा कायदा मागे घेतला जाईपर्यंत लढा देण्याची भूमिका व्यक्त केली. हा कायदा माणुसकीविरोधात असल्याचे ते म्हणाले.