“राष्ट्रवादी काँग्रेस राजकीयदृष्ट्या सर्वांत कमकुवत पक्ष, त्यांचे मोठे नेते भाजपच्या गळाला लागणार”
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 18:27 IST2023-05-25T18:25:56+5:302023-05-25T18:27:10+5:30
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनी सतर्क राहावे. महाविकास आघाडीच्या नादी लागू नये, असा सल्लाही देण्यात आला आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेस राजकीयदृष्ट्या सर्वांत कमकुवत पक्ष, त्यांचे मोठे नेते भाजपच्या गळाला लागणार”
Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्यात विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेते आणि सत्ताधारी भाजप-शिवसेना शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस राजकीयदृष्ट्या सर्वांत कमकुवत पक्ष असल्याचे मोठे विधान करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आंदोलन करून आक्रमक भूमिका घेतली. अखेर शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला. या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि पक्षाभोवती अनेक घडामोडी घडत असल्याचे दिसत असून, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या गळाला लागणार असल्याचा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस राजकीयदृष्ट्या सर्वांत कमकुवत पक्ष
राष्ट्रवादीत जयंत पाटील यांच्याप्रमाणे अनेक जणांना जर अल्टिमेटम दिला की ‘आम्ही एकतर तुम्हाला अटक करू किंवा तुम्ही भाजपत या’, तर ते भाजपत जाण्यासाठी कधीही इच्छुक असतील. ते तुरुंगात जाण्यास इच्छुक नसतील. त्यामुळे सध्याच्या ईडीच्या राजकारणात इथला सगळ्यात कमकुवत राजकीय घटक कोणता असेल, तर तो राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यांचे अनेक नेते भाजपच्या गळाला लागणार आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच महाविकास आघाडीच्या नादी लागू नका, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.