काँग्रेसला 'हात' दाखवत प्रज्ञा सातव भाजपमध्ये! पुन्हा विधान परिषदेवर जाण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 11:39 IST2025-12-19T11:39:32+5:302025-12-19T11:39:58+5:30
काँग्रेसचे विधान परिषदेत सहा आमदार उरले असून, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले हे काँग्रेसचे सहयोगी सदस्य आहेत.

काँग्रेसला 'हात' दाखवत प्रज्ञा सातव भाजपमध्ये! पुन्हा विधान परिषदेवर जाण्याची शक्यता
मुंबई : काँग्रेस पक्ष आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत प्रज्ञा राजीव सातव यांनी समर्थकांसह गुरुवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत येथे भाजपमध्ये प्रवेश केला. विधान परिषदेतील काँग्रेसचे संख्याबळ एकने कमी झाल्याने विरोधी पक्षनेतेपदावरील काँग्रेसच्या दाव्याला धक्का बसला आहे.
काँग्रेसचे विधान परिषदेत सहा आमदार उरले असून, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले हे काँग्रेसचे सहयोगी सदस्य आहेत. उद्धवसेनेचे पाच आमदार आहेत. काँग्रेसच्या आणखी एका विधान परिषद सदस्याला भाजपमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. तसे झाले तर अनिल परब यांना विरोधी पक्षनेते करण्याचा आग्रह उद्धवसेनेकडून धरला जाण्याची शक्यता आहे.
दिलीप माने भाजपमध्ये
सोलापूर दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने यांनी यावेळी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. निष्ठेने काम करून भाजपचा विचार तळागाळात पोहोचवू, असे माने यावेळी म्हणाले. माजी मंत्री कृपाशंकरसिंह, आ. सचिन कल्याणशेट्टी आदी यावेळी उपस्थित होते.
सातव यांनी विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांना भेटून विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण व्हायला आणखी पाच वर्षे बाकी होती. विधानसभा सदस्यांमधून त्या विधान परिषदेवर निवडून गेल्या होत्या. आता भाजपने त्यांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्द दिला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे प्रभावित होऊन आणि दिवंगत राजीव सातव यांचे हिंगोली जिल्हा विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला, असे सातव यांनी भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सांगितले.