राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेलांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी, सुनील तटकरे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 07:09 PM2024-02-14T19:09:41+5:302024-02-14T19:10:13+5:30

RajyaSabha Election 2024 : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी सर्व उमेदवार जाहीर झाले आहेत. यातील 3 जागा भाजपाला मिळणार आहेत, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळेल.

Praful Patel RajyaSabha Election 2024- Praful Patel again nominated for Rajya Sabha from NCP | राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेलांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी, सुनील तटकरे यांची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेलांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी, सुनील तटकरे यांची माहिती

Praful Patel RajyaSabha Election 2024: भाजप, शिवसेना आणि काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपला राज्यसभेचा उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाने ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, प्रफुल्ल पटेलांचा राज्यसभेचा बराच कार्यकाळ शिल्लक आहे. त्यामुळे पक्षाच्या या निर्णयाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यातील तीन जागा भाजपला मिळणार आहेत, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. इतर तीन पक्षांनी यापूर्वीच आपले उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे अजित पवार गटाकडून कुणाला संधी दिली जाणार? याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. आता अखेर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल पटेल निवडून आल्यानंतर आपल्या आधीच्या सदस्यपदाचा राजीनामा देतील. त्यानंतर मे महिन्यात पटेलांच्या आधीच्या टर्मसाठी पोटनिवडणूक होईल, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे. दरम्यान, या पदासाठी पक्षातून अनेकजण इच्छूक होते. इतर कुणाला उमेदवारी दिली असती, तर पक्षात नाराजी पसरण्याची शक्यता होती, त्यामुळेच हा असा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

महायुतीकडून आतापर्यंत राज्यसभेच्या 6 पैकी 5 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. सहाव्या जागेबाबतचा सस्पेन्स कायम आहे. सहाव्या जागेवर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे संकेत महायुतीच्या नेत्यांनी आधीच दिले आहेत. त्यामुळे महायुतीने सहाव्या जागेसाठी खरंच उमेदवार दिला तर लढत चुरशीची होईल. राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या देखील नावाची चर्चा होती. पण प्रफुल्ल पटेल यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.

भाजप आणि शिवसेन आणि काँग्रेसचे उमेदवार जाहीर
राज्यसभेसाठी भाजपाकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. भाजपाने आपल्या पक्षाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना राज्यसभेचे तिकीट दिले. तर शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे राज्यसभेवर जाणार आहेत. 

Web Title: Praful Patel RajyaSabha Election 2024- Praful Patel again nominated for Rajya Sabha from NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.