Politics: महायुतीसह मविआतही फूट! दोन्ही आघाड्यांमध्ये मित्रपक्षच विरोधात ठाकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 10:46 IST2025-11-16T10:44:38+5:302025-11-16T10:46:19+5:30
Maharashtra Politics: भाजपला रोखण्यासाठी शिंदेसेना आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या जोरदार हालचाली, शरद पवारांकडून स्थानिकांना मोकळीक

Politics: महायुतीसह मविआतही फूट! दोन्ही आघाड्यांमध्ये मित्रपक्षच विरोधात ठाकले
यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्तारुढ महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष हे एकमेकांविरुद्ध लढणार असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. नगर परिषदांप्रमाणेच जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीतही हेच चित्र बघायला मिळेल, अशी स्थिती आहे.
युती वा आघाडीचे अधिकार प्रत्येक पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवर दिल्याने प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक नेत्यांना पूर्ण मोकळीक मिळाली असून स्थानिक समीकरणांचा विचार करून निर्णय घेतले जात आहेत. स्थानिक पातळीवर भाजप बलाढ्य असेल तर त्याला रोखण्यासाठी शिंदेसेना आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या जोरदार हालचाली काही नगर परिषदांमध्ये होत आहेत.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील काही नगर परिषदा अशाही आहेत जिथे भाजपने मित्रपक्षांशी चर्चाच न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या मित्रपक्षांनी भाजपला रोखण्यासाठी कुठे उद्धव सेना तर कुठे शरद पवार गटाशी हातमिळवणी केली आहे. महायुतीत शक्यतो फाटाफूट होऊ नये यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. भाजपने आम्हाला अगदीच नगण्य जागा देऊ केल्या आहेत, त्यापेक्षा वेगळे लढलेले बरे, अशी भावना शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांनी वर कळविली आहे.
महाविकास आघाडीचे चित्र
स्थानिक पातळीवर निर्णय घ्या पण भाजप किंवा शिंदेसेना आणि अजित पवार गटासोबत कुठेही युती करू नका, असे उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षजनांना बजावले आहे. काँग्रेसनेही भाजप व मित्रपक्षांसोबत जाऊ नका, असे स्पष्टपणे खाली सांगितले आहे. शरद पवार गटाने मात्र भाजप आणि मित्रपक्षांसोबत जायचेच नाही, असे बजावून सांगितलेले नाही. स्थानिक पातळीवर आम्ही मुभा दिली आहे, असे त्यांचे नेते सांगत आहेत.आमच्या पक्षात असा निर्णय झाला आहे की या निवडणुका आम्ही पक्ष म्हणून लढणार नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा; तो त्यांचा अधिकार आहे , असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी म्हटले.
दोन्ही पवार गट एकत्र
अजित पवार गटाने काही ठिकाणी शरद पवार गटासोबत आघाडी केल्याचे चित्र दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड नगर पंचायत निवडणुकीत दोघे एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे, शरद पवार गटाचे उमेदवार हे अजित पवार गटाच्या घड्याळ या चिन्हावर लढणार आहेत. आंबाजोगाई (जि.बीड) येथेही दोन्ही पक्ष एकत्र लढतील, अशी घोषणा अजित पवार गटाचे माजी नगराध्यक्ष पापा मोदी यांनी केली आहे. शिराळा आणि जत (जि. सांगली) येथे या दोन पक्षांनी एकत्र येत भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांना आव्हान दिले आहे. सातारा जिल्ह्यातील म्हसवड नगरपालिकेत भाजप विरोधात सर्व राजकीय पक्ष एकवटले आहेत.
नातेवाईकांची गर्दी
भाजपचे मंत्री, आमदार यांनी अनेक ठिकाणी आपल्या जवळच्या नातेवाइकांना थेट नगराध्यक्षपदाची संधी मिळावी यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असून किमान डझनभर तरी असे उमेदवार आहेत. उमेदवार जाहीर झाल्यानंतर सर्वाधिक घराणेशाही ही भाजपमध्ये दिसेल. विदर्भात ही संख्या सर्वात जास्त असेल.