मुंबई - राहुल गांधी यांची विरोधकांसोबत चर्चा झाली आहे. त्यानंतरच त्यांनी व्यासपीठावर हायड्रोजन बॉम्बबाबत भाष्य केले. व्होट चोरी हा बॉम्ब आहे. मात्र राहुल गांधी सध्या जो रिसर्च करत आहेत, त्यांच्याकडे पुराव्यासह काही माहिती आली आहे. त्यामुळेच येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल घडतील असा दावा उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, राहुल गांधी पुराव्याशिवाय बोलत नाही. मागील काही दिवस मी म्हणतोय, पुढच्या काही महिन्यात देशात राजकीय परिवर्तन होईल आणि त्या परिवर्तनाला हायड्रोजन बॉम्ब कारणीभूत ठरेल. नरेंद्र मोदी चीन, जपानमधील अखेरचं परदेशी पर्यटन करून घेत आहेत. परदेशात फिरणे त्यांचा छंद आहे. देशात आल्यानंतर माझ्या आईला शिव्या घातल्या म्हणून रडू लागले. देशाच्या प्रश्नावर बोला, रडताय कशाला..कुणीही मतदार अधिकार यात्रेत नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईविषयी अपशब्द वापरलेला नाही. संपूर्ण यात्रा मीदेखील पाहिली आहे. त्यांच्या आईबाबत कुठेही अपशब्द वापरले नाहीत असं त्यांनी सांगितले.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
मतचोरीच्या मुद्द्यावर आक्रमक असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी १७ ऑगस्टपासून बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा सुरू केली. बिहारमधील ‘मतदार अधिकार यात्रेचा’ सोमवारी पाटण्यात समारोप झाला. ही यात्रा म्हणजे ॲटम बॉम्ब होती. आता ‘हायड्रोजन बॉम्ब’ फुटेल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला होता.
दरम्यान, मतचोरीच्या मुद्दा घेऊन महाराष्ट्र काँग्रेसने कामठी येथे राज्यस्तरीय निषेध मेळावा आयोजित केला होता. मतचोरीतून पुन्हा इंग्रजांपेक्षा वाईट काळात भाजपा आपल्याला नेत आहे. मतचोरीतून सरकार आणायचे, त्यानंतर नोटचोरी करून मतदारांना विकत घ्यायचे हा त्यांचा प्रकार आहे. पैसा फेक तमाशा देख हा खेळ भाजपा करत आहे. देशात सध्या मुदतपूर्व निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. ७५ वर्ष झाल्यानंतर रेशीमबागच्या बाबाने दिल्लीच्या बाबाला खुर्ची खाली करण्यास सांगितली आहे. त्यात राहुल गांधींनी इन्कलाब जिंदाबादचा नारा दिला आहे. त्यामुळे मोदींच्या सत्तेची खुर्ची डगमगू लागली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे आणि आता तो दिवस दूर नाही की, देशात मध्यवर्ती निवडणूक लागतील आणि नवीन सरकार येणार आहे असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.