राज्यात दुबार मतदारांवरून रंगला राजकीय वार-पलटवार; व्हाेट जिहादचा मुद्दा तापला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 13:36 IST2025-11-04T13:35:24+5:302025-11-04T13:36:08+5:30
मतदारसंघात दुबार मतदारांवरून कलगीतुरा

राज्यात दुबार मतदारांवरून रंगला राजकीय वार-पलटवार; व्हाेट जिहादचा मुद्दा तापला
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कोणत्या मतदारसंघात किती मतदार दुबार आहेत, यावरून आता राज्याच्या राजकारणात 'धर्म'संकट आले आहे. कुठे हिंदू मतदार दुबार तर कुठे मुस्लिम मतदार दुबार यावरून राजकारण तापले आहे. सत्ताधारी भाजपचे नेते आणि मंत्री ॲड. आशिष शेलार यांनीही दुबार मतदार कुठे कुठे असल्याचे सांगितल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आता 'दुबार'चे युद्ध पेटले आहे.
राज ठाकरे यांना हिंदू आणि मराठी दुबार मतदार दिसतात. मात्र अनेक मतदारसंघातील मुस्लिमांची दुबार नावे दिसत नाहीत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ‘व्होट जिहाद’ करत अनेक प्रामाणिक मतदारांची नावे वगळली, असा आरोप मंत्री शेलार यांनी केला. त्यानंतर, सर्वच धर्माच्या मतदारांची दुबार नावे मतदार यादीतून वगळण्याची आमची मागणी असल्याचे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.
राज ठाकरे समाजांमध्ये भेदभाव करताहेत : शेलार
भाजप कधीच मतदारांमध्ये भेद करत नाही. मात्र आघाडी आणि आता नवा भिडू राज ठाकरे हे जाती, धर्म, समाजांमध्ये भेदभाव करत असून त्यांना आम्ही उघडे पाडणार आहोत. मविआच्या अनेक आमदारांच्या मतदारसंघात मुस्लीम दुबार मतदारांची संख्या आणि आमदारांचे मताधिक्य याची आकडेवारी सांगत अनेक आमदारांचा विजय या मुस्लीम दुबार मतदारांमुळेच झाला असे म्हणायचे का? असा सवाल करत शेलार यांनी राज ठाकरे आणि विरोधकांना लक्ष्य केले.
आशिष शेलारांकडून फुलटॉस : उद्धव ठाकरे
मी आज आशिष शेलार यांचे जाहीर अभिनंदन करतो. मतदार यादीत गोंधळ असल्याचे शेलार यांनीही सिद्ध केले असून त्यांनी आम्हाला फुलटॉस दिला आहे. आम्ही आयोगाकडे संपूर्ण मतदार यादीत सुधारणा मागतो आहोत, ठराविक कुठल्या यादीत नाही. शेलार यांनी लोकसभेपासूनचा मतदार यादीतील घोटाळा काढला. यांचे हे धाडस कौतुकास्पद असल्याचे सांगत सरकार तुमचे असताना विरोधक घोटाळा करतात म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नालायक आहात, अशा शब्दांत ठाकरेंनी निशाणा साधला.
काँग्रेस, मनसेही मैदानात
भाजपला यातही हिंदू-मुस्लीमच दिसते, यावरून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला. आम्ही जी दुबार मतदारांची यादी दाखवली त्यात हिंदूच मतदार आहेत इतर धर्माचे नाहीत हे शेलार कशाच्या आधारावर बोलतात? असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला.