महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 13:14 IST2025-04-26T13:13:36+5:302025-04-26T13:14:18+5:30
जर पोलिसांनी एक दिवस जरी प्रामाणिक काम केले तर सर्व वाईट गोष्टी संपतील. गुन्हेगारी संपेल. बुलढाण्यात २ पोलिसांची चोरांसोबत पार्टनरशिप होती असा दावा संजय गायकवाड यांनी केला.

महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
बुलढाणा - आपल्या विधानांनी कायम चर्चेत असणारे शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी महायुती सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. राज्यातील पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे करत अप्रत्यक्षपणे आमदार गायकवाड यांनी गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केले आहे. नवा कायदा आला की हफ्ता वाढतो असं वादग्रस्त विधानही आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.
बुलढाणा येथे पत्रकार परिषदेत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न विचारल्यावर संजय गायकवाड म्हणाले की, नवा कायदा आला की पोलिसांचा हफ्ता वाढतो. महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम आहेत. आपला देश वगळता अन्य ठिकाणी इतके अकार्यक्षम पोलीस सापडत नाहीत. गुटखा बंदी केली की यांचा हफ्ता वाढला, दारूबंदी केली की यांचा हफ्ता वाढला असा आरोप त्यांनी केला.
तसेच चोरीचा माल पोलिसांच्या घरात राहायचा. त्यांची नावे सांगणार नाही. जर पोलिसांनी ठरवले १ वर्ष प्रामाणिक काम करेन तर सगळे सुतासारखे सरळ होतील. जर पोलिसांनी एक दिवस जरी प्रामाणिक काम केले तर सर्व वाईट गोष्टी संपतील. गुन्हेगारी संपेल. बुलढाण्यात २ पोलिसांची चोरांसोबत पार्टनरशिप होती. चोराला पकडायला गेले की हे पोलीस त्यांना आधीच इन्फॉर्म करायचे असं आमदार गायकवाड यांनी सांगितले.
कोरोनाकाळात फडणवीसांवर केली होती जहरी टीका
दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी कोरोना काळातही देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका केली होती. राज्यासह देशभरात कोरोनानं हाहाकार उडाला आहे. पण विरोधी पक्ष मदत करायचे सोडून राजकारण करत आहे. मला जर कोरोना विषाणू मिळाला तर तो देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबेन असं विधान संजय गायकवाड यांनी केले होते.