"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 14:22 IST2025-10-26T14:22:05+5:302025-10-26T14:22:05+5:30
फलटण येथील मृत डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस यांनी संशय व्यक्त केले आहेत.

"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली. यावेळी तिने हातावर एक नोट लिहून पोलिस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, आता या प्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस यांनी संशय व्यक्त केला आहे.
आमदार धस यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. मृत डॉक्टर तरूणीने अनेक वेळा तक्रार अर्ज केला होता. पण वरिष्ठ पातळीवर याची कोणीही दाखल घेतली नाही. त्यामुळे यातील सर्वच दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली. दरम्यान, त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
"पहाटे पाच वाजता मी ती बातमी पाहिली. रात्री उशिरा तो पोलीस आरोपी सरेंडर झाला आहे. त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्याच खुर्चीवर बसून डॉक्टरांना धमक्या देणे आणि अनफिट असताना फिटचं सर्टिफिकेट द्यायला लावणे, अशी कृत्ये तिथे सुरू होती, असंही धस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
आमदार सुरेश धस म्हणाले, तेथील पीआय, डीवायएसपीला, डॉक्टर तरूणीने सांगितलं होतं. तेथील एसपींकडे देखील त्या डॉक्टर तरुणीने तक्रार दिलेली होती. या प्रकरणाच्या संबंधी आम्ही उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन यांच्यामध्ये आयपीएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करून एसआयटी स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि बनकर आणि बदने सोडता त्यांनी इतर ज्या ज्या वेळी पत्र दिले आहेत, तीन वेळा पत्र देऊन सुद्धा कोणताही पाठपुरावा झाला नाही. कंत्राटी डॉक्टरला किती वेळा पोस्टमार्टम ड्युटी दिली जाते, त्याबाबत देखील नियमावली तपासली जावी, अशी मागणी करणार असल्याचे धस म्हणाले.
डॉक्टर तरुणीलाच वारंवार हीच ड्युटी का दिली जात होती याची चौकशी व्हावी. अनफिट असताना देखील फिट असल्याचा सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणला होता. त्यांनी वारंवार सांगितलं होते. डॉक्टर ज्यांच्याकडे तक्रार केली होती, त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे या सर्व बाबींची चौकशी व्हावी, अशी मागणी करणार असल्याचे धस म्हणाले.