रविकांत तुपकरांना पोलिसांनी केली अटक; सोयाबीन-कापूस आंदोलन पेटण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 05:27 PM2023-11-25T17:27:26+5:302023-11-25T17:28:03+5:30

२० नोव्हेंबरला बुलढाण्यात रविकांत तुपकरांनी एल्गार महामोर्चा झाला होता. जिल्हाभरातून हजारो शेतकरी बुलढाण्यात धडकले होते.

Police arrested Ravikant Tupkar; Soybean-cotton agitation likely to ignite | रविकांत तुपकरांना पोलिसांनी केली अटक; सोयाबीन-कापूस आंदोलन पेटण्याची शक्यता

रविकांत तुपकरांना पोलिसांनी केली अटक; सोयाबीन-कापूस आंदोलन पेटण्याची शक्यता

बुलढाणा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना शनिवारी बुलढाणा पोलिसांनी अटक केली. तुपकर यांच्या चिखली रोडवरील राहत्या घरून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तुपकारांच्या अटकेनंतर जिल्ह्यात सोयाबीन कापसाचे आंदोलन आता पेटण्याची शक्यता आहे. 

२० नोव्हेंबरला बुलढाण्यात रविकांत तुपकरांनी एल्गार महामोर्चा झाला होता. जिल्हाभरातून हजारो शेतकरी बुलढाण्यात धडकले होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार झाला नाही तर २८ नोव्हेंबरला मुंबईला धडक देऊन २९ नोव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा तुपकर यांनी दिला होता. याबाबत शुक्रवारी तुपकरांना पोलिसांनी नोटीस बजावली होती परंतु अशा नोटिशींना आपण भीक घालत नाही असे तुपकर म्हणाले होते. 

दरम्यान शनिवारी सकाळी तुपकरांच्या अटकेची पूर्वतयारी पोलिसांनी केली. बुलढाणा शहर पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त आधी निवासस्थानी तैनात केला. त्यानंतर दुपारच्या सुमारास तुपकर यांना ताब्यात घेण्यात आले. बुलढाणा शहरात ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेकडे शेतकऱ्यांसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

कार्यकर्ते आक्रमक
रविकांत तुपकर यांना अटक केल्याचे कळताच त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सोयाबीन कापसाला हमी भाव मिळावा. राज्यात दुष्काळ जाहीर करावा यासाठी तुपकरांनी एल्गार मोर्चा काढला होता. परंतु सरकार सकारात्मक प्रतिसाद देत नाही. आज खोके सरकारानं पोलिसांच्या माध्यमातून या तुपकरांना अटक केली. जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही आणि तुपकरांची सुटका सरकारने केली नाही तर उद्यापासून आम्ही मंत्र्यांच्या गाड्या जाळू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथडे यांनी दिला आहे. दुसरीकडे तुपकरांना अटक केली म्हणून कार्यकर्त्यांनी चिखली तालुक्यातील जालना-खामगाव महामार्गावर टायर जाळून सरकारचा निषेध केला. 
 

Web Title: Police arrested Ravikant Tupkar; Soybean-cotton agitation likely to ignite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.