वर्धा, यवतमाळ, नांदेड, बीडमधील पिण्याच्या पाण्यात मिसळलेय विष!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:35 IST2025-01-04T13:35:48+5:302025-01-04T13:35:55+5:30

भूजलातील नायट्रेटची मात्रा ४५ मिलीग्रॅम/लिटरपेक्षा जास्त. भूजल गुणवत्ता अहवाल-२०२४ मधील धक्कादायक वास्तव. देशातील १५ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांचा समावेश.

Poison mixed in drinking water in Wardha, Yavatmal, Nanded, Beed! | वर्धा, यवतमाळ, नांदेड, बीडमधील पिण्याच्या पाण्यात मिसळलेय विष!  

वर्धा, यवतमाळ, नांदेड, बीडमधील पिण्याच्या पाण्यात मिसळलेय विष!  

मुंबई : महाराष्ट्रातील वर्धा, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, बीड आणि जळगाव या ७ जिल्ह्यातील भुजलात विषारी पदार्थ मिसळलेले असल्याचे धक्कादायक वास्तव केंद्र सरकारच्या अहवालातून उघड झाले आहे. 

या जिल्ह्यांच्या भूजलात नायट्रेट या विषारी रसायनाचे प्रमाण धोकादायक पातळीपेक्षा अधिक प्रमाणात आढळले असून ते आरोग्यासाठी घातक आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) यांनी पिण्याच्या पाण्यातील नायट्रेटची मर्यादा ४५ मिलीग्रॅम प्रति लिटर निश्चित केली आहे. मात्र, देशातील एकूण ४४० जिल्ह्यांमध्ये पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळले आहे. केंद्रीय भूजल मंडळाच्या (सीजीडब्ल्यूबी) 'वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल-२०२४' मध्ये हा खुलासा करण्यात आला आहे. अहवालानुसार अभ्यासलेल्या नमुन्यांपैकी २० टक्के नमुन्यांमध्ये नायट्रेटची पातळी मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळले.

१५ जिल्हे रेड झोनमध्ये 
- राजस्थान : बाडमेर, जोधपूर 
- महाराष्ट्र : वर्धा, बुलढाणा, अमरावती, नांदेड, बीड, जळगाव आणि यवतमाळ  
- तेलंगणा : रंगारेड्डी, आदिलाबाद आणि सिद्धीपेट  
- तमिळनाडू : विल्लुपुरम  - आंध्र प्रदेश : पलनाडू   - पंजाब : भटिंडा 

हे आहेत नायट्रेटचे स्रोत : सांडपाण्याचे गैरव्यवस्थापन, वॉटर ट्रीटमेंट प्लांटची योग्य देखभाल न करणे, रासायनिक खते

धोक्याच्या उंबरठ्यावर : उत्तरप्रदेश, केरळ, झारखंड आणि बिहार यांना धोका नाही : अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, मेघालय, मिझोराम आणि नागालँड 

२०% नमुन्यांमध्ये नायट्रेट अधिक  
९.०४% नमुन्यांमध्ये फ्लोराइडची पातळी मर्यादेपेक्षा जास्त  
३.५५% नमुन्यांमध्ये आर्सेनिक प्रदूषण आढळले  

नायट्रेटचे प्रमाण अधिक कुठे?  
४०% पेक्षा जास्त     : राजस्थान, कर्नाटक आणि         तमिळनाडू  
३५.७४%     : महाराष्ट्र  
२७.४८%    : तेलंगणा  
२३.५%    : आंध्रप्रदेश  
२२.५८%    : मध्यप्रदेश  

- राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये नायट्रेटची पातळी २०१५ पासून स्थिर  
- उत्तर प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि
हरयाणामध्ये २०१७ ते २०२३ दरम्यान नायट्रेटच्या प्रमाणात वाढ.

३८ कोटी लोक धोक्यात 
भारताच्या भूजलामधील नायट्रेट प्रदूषणाच्या स्थितीचा अंदाज अमेरिकन केमिकल सोसायटीच्या अहवालात वर्तवला आहे. या अंदाजानुसार, भारताचा ३७% भूभाग आणि ३८ कोटी लोक नायट्रेटच्या धोक्याच्या कक्षेत आहेत.

१५२५९ ठिकाणी परीक्षण  
- मे, २०२३ मध्ये भूजलाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी देशभरातून एकूण १५२५९ स्थळांची निवड करण्यात आली.  
- २५% विहिरींवर (बीआयएस १०५०० नुसार सर्वाधिक धोकादायक) सविस्तर अभ्यास करण्यात आला.  
- पुनर्भरणामुळे गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामांची माहिती घेण्यासाठी मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतर ४९८२ ठिकाणांहून भूजलाचे नमुने गोळा करण्यात आले.  

किती आहे धोकादायक?  
- नायट्रेट पाणी किंवा अन्नाद्वारे शरीरात प्रवेश करते. ते तोंड आणि आतड्यांमध्ये असलेल्या जीवाणूंमार्फत ऑक्सिडायझर असलेल्या नायट्राइटमध्ये रूपांतरित होते. नायट्राइट हिमोग्लोबिनमधील आयर्न फॅरसला फॅरिकमध्ये बदलते. 
- यामुळे हिमोग्लोबिनचे रुपांतर मेटहिमोग्लोबिनमध्ये होते. अशा परिस्थितीत हिमोग्लोबिन अर्थात रक्त आपली ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता गमावते. 

कोणते आजार होतात?  
- पोटाचा कर्करोग  
- लहान मुलांमध्ये ‘ब्लू बेबी सिंड्रोम’  
- जन्मदोष  
- जन्मजात व्यंग
- न्यूरल ट्यूब दोष  

कारणे काय?
भूजलामधील नायट्रेटची वाढती पातळी अत्यधिक सिंचनाचा परिणाम असू शकतो. खतांमधील नायट्रेट जमिनीत खोलवर जाऊन ते पाण्यात मिसळले जाते.  

बचावाचे उपाय  
- पिण्यासाठी सुरक्षित पर्याय, जसे की बाटलीबंद पाणी वापरा  
- खासगी बोअरवेल किंवा विहिरीतून पाणी येत असल्यास वर्षातून एकदा पाण्यातील नायट्रेटची तपासणी करा  
- नायट्रेटचे प्रमाण जास्त असल्यास उकळलेले पाणी हा सुरक्षित पर्याय ठरतो  
- परिसरातील नायट्रेटच्या संभाव्य स्रोतांचा शोध घ्या आणि ते दूर करा.

मानक : जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) यांनी पिण्याच्या पाण्यात नायट्रेटची मर्यादा ४५ मिलीग्रॅम/लिटर निश्चित केली आहे.  

Web Title: Poison mixed in drinking water in Wardha, Yavatmal, Nanded, Beed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.