प्लास्टिक फुले, कारवाईचे अधिकार महापालिकांना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; विशेष सूचना काढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 10:54 IST2026-03-19T10:54:37+5:302026-03-19T10:54:58+5:30
राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही सण, उत्सव, समारंभात प्लास्टिकची फुले सर्रास दिसतात. या फुलांमुळे पर्यावरणाची हानी होते, असा तारांकित प्रश्न आ. प्रवीण दरेकर यांनी मांडला.

प्लास्टिक फुले, कारवाईचे अधिकार महापालिकांना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; विशेष सूचना काढणार
मुंबई : राज्यात कृत्रिम (प्लास्टिक) फुलांचा वाढता वापर हा शेतकऱ्यांच्या नैसर्गिक फुलांच्या व्यवसायावर परिणाम करत आहे. त्यासाठी प्लास्टिक बंदीअंतर्गत विशेष सूचना काढून प्लास्टिक फुलांवर बंदी करण्यात येईल. महापालिकांना कारवाईचे अधिकार देण्यात येतील. यासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्यात येइल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानपरिषदेत केली.
राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही सण, उत्सव, समारंभात प्लास्टिकची फुले सर्रास दिसतात. या फुलांमुळे पर्यावरणाची हानी होते, असा तारांकित प्रश्न आ. प्रवीण दरेकर यांनी मांडला. तर आ. शशिकांत शिंदे यांनी मुंबईतील लोहार चाळीत सर्रास प्लास्टिकची फुले दिसतात याकडे लक्ष वेधले.
डेकोरेटर, बँक्वेट हॉल्सना कारवाईच्या नोटिसा देणार
मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देताना प्लास्टिक फुलांचा वापर करणारे डेकोरेटर, बँक्वेट हॉल्स यांनाही नोटीस दिल्या जातील. त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
तर पर्यावरणमंत्री पंकज मुंडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २९ ऑगस्ट २०२५ रोजी कृत्रिम फुलांचा वापर टाळण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे.
३,३९० ठिकाणी कारवाई १.५५ कोटी दंड वसूल
एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या काळात १,२४,७८३ आस्थापनांची तपासणी केली. यातील ३,३९० आस्थापनांवर कारवाई करून ६७.५४ मेट्रिक टन प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर १.५५ कोटी दंड वसूल केल्याची माहिती दिली.