टिटवाळ्याजवळील पूल धोकादायक
By Admin | Updated: August 5, 2016 02:02 IST2016-08-05T02:02:49+5:302016-08-05T02:02:49+5:30
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे काळू नदीला पूर आल्याने रुंदे गावाजवळील पूल दोन दिवस पाण्याखाली होता.

टिटवाळ्याजवळील पूल धोकादायक
टिटवाळा : नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे काळू नदीला पूर आल्याने रुंदे गावाजवळील पूल दोन दिवस पाण्याखाली होता. त्यामुळे या पुलावरील एका स्लॅबचा काँक्रिटचा थर वाहून गेला आहे. लोखंडी शिगा वर आल्याने वाहने आपटण्याच्या घटना घडत आहेत. तसेच लोखंडी रेलिंग तुटल्याने अपघाताची भीती आहे.
१९९५ मध्ये तत्कालीन आमदार दिगंबर विशे यांच्या प्रयत्नाने काळू नदीवरील हा पूल उभारण्यात आला. या पुलामुळे २० ते २५ ग्रामस्थांची होडीच्या प्रवासातून सुटका झाली आहे. त्यामुळे हा पूल ग्रामस्थांसाठी वरदान ठरला आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे हा पूल दोन दिवस पाण्याखाली होता. परिणामी, पुलाच्या मधल्या स्लॅबचे काँक्रिट वाहून गेले. पूर ओसरल्याने आता वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, लोखंडी शिगा वर आल्याने वाहनांचे छोटे-मोठे अपघात घडले आहेत. (प्रतिनिधी)
>रुंदे गावाजवळील काळू नदीच्या पुलाची तात्पुरती डागडुजी केली जाणार आहे. उन्हाळ्यात काँक्रिटीकरण केले जाईल. संरक्षक कठडा उभारण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
- जी. पी. डोंबाळे,
उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कल्याण