स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीतही पिंपरी-चिंचवडला नाकारले

By admin | Published: September 21, 2016 10:29 PM2016-09-21T22:29:48+5:302016-09-21T22:29:48+5:30

केंद्र सरकारच्या नगरविकास खात्याने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीतही पिंपरी-चिंचवडचा समावेश नाही.

Pimpri-Chinchwad was denied in the third list of Smart City | स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीतही पिंपरी-चिंचवडला नाकारले

स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीतही पिंपरी-चिंचवडला नाकारले

Next

ऑनलाइन लोकमत

पिंपरी, दि. २१  : केंद्र सरकारच्या नगरविकास खात्याने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीतही पिंपरी-चिंचवडचा समावेश नाही. त्यामुळे राजकीय पक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त झाली. स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवडवर अन्याय केला जात आहे. राजकीय द्वेषापोटी शहरावर अन्याय होत असल्याची टीकाही करण्यात आली. पुढील यादीत पिंपरीचा समावेश करावा, अशीही मागणी होऊ लागली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १०० शहरे स्मार्ट करण्याची योजना आखली. त्यानुसार प्रत्येक राज्यांनी दहा शहरांची यादी नगरविकास खात्याकडे पाठवायची होती. त्यानुसार गुणांकन केले होते. त्यात पिंपरी-चिंचवडला ९२.५० टक्के गुण मिळाले होते. राज्य सरकारने पाठविलेल्या पहिल्या यादीत पिंपरी आणि पुणे असे एकत्रित करून पिंपरी-चिंचवडचे नाव पाठविले होते. मात्र, एकत्रित समावेशास पुण्यातील राजकीय नेत्यांनी आक्षेप घेतला होता. पिंपरीबरोबर आमचा समावेश नको; स्वतंत्र हवा, अशी मागणी केली होती. त्यामुळे नगरविकास खात्यास पाठविलेल्या यादीत पिंपरी-चिंचवडला वगळण्यात आले होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

भारतीय जनता पक्षानेही आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न केला होता. २०१५ मध्ये १०० शहरांची यादी नगरविकास खात्याने प्रकाशित केली होती. या योजनेनुसार २०१६ या वर्षात ४० शहरांची नावे जाहीर करण्यात येणार होती. त्यानुसार जानेवारी महिन्यात पहिली यादी प्रसिद्ध झाली. त्यात २० शहरांचा समावेश होता. त्यानंतर मे महिन्यात १३ शहरांची यादी जाहीर झाली. त्यानंतर तिसरी यादी जाहीर झाली. त्यातही महाराष्ट्रातील पाच शहरांचा समावेश होता. मात्र, पिंपरी-चिंचवडचा स

एकजूट करूनही घोर निराशा
स्मार्ट सिटीत डावलल्याने विविध राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संस्था-संघटनांनीही केंद्र सरकारवर टीका केली होती. गुणवत्ता असतानाही डावललेच कसे, असा प्रश्नही उपस्थित केला होता. त्या विषयी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेधही केला होता. नंतर खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, शिवाजी आढळराव पाटील यांनीही पिंपरीच्या समावेशासाठी नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या समवेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर शकुंतला धराडे यांच्या शिष्टमंडळानेही व्यंकय्या नायडू आणि पंतपधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मागणी केली होती. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन स्मार्ट सिटी समावेशाची मागणी केली होती. त्यानंतर सर्वांनी महाराष्ट्रातील अन्य कोणते शहर रद्द झाल्यास पिंपरी-चिंचवडचा विचार करू, असे सूचित केले होते. त्यानंतर स्मार्ट सिटीविषयीची दुसरी आणि तिसरी यादी जाहीर केली. त्यातही पिंपरीचा नंबर नाही. त्यामुळे घोर निराशा झाली आहे.

केंद्र सरकारचा निषेध
स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीत डावलल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारचा निषेध केला आहे. काँग्रेसच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आली. विविध सामाजिक संस्थांनीही केंद्राचा निषेध केला आहे. महापौर धराडे म्हणाल्या, मुळातच स्मार्ट असणाऱ्या पिंपरी-चिंचवडचा नवीन यादीत समावेश नाही. आमची घोर निराशा झालेली आहे. मुख्यमंत्री, तसेच व्यंकय्या नायडू यांनीही आश्वासन दिले होते. मात्र, ते पाळले गेले नाही. कदाचित सरकारला वाटत असेल, की पिंपरी-चिंचवड शहर आधीच स्मार्ट आहे. म्हणून त्यांनी आपल्याला घेतले नसेल.ह्णह्ण
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, तिसऱ्या यादीत तरी आपल्या शहराचा समावेश होईल, अशी शहरवासीयांना आशा होती. मात्र, केंद्र सरकारने जाणूनबुजून डावलले आहे. पिंपरी-चिंचवड शहराला केंद्र सरकारने तिसऱ्यांदा ठेंगा दाखविला आहे. केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून भाजपाने शहराला डावलले आहे.

 

Web Title: Pimpri-Chinchwad was denied in the third list of Smart City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.