"कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी..."; मनु्स्मृतीबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 02:26 PM2024-05-27T14:26:28+5:302024-05-27T14:40:15+5:30

राज्य सरकारकडून शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकाचा समवेश करण्याबाबत अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं.

Manusmriti will not be allowed as long as we in Power says Ajit Pawar | "कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी..."; मनु्स्मृतीबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान

"कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी..."; मनु्स्मृतीबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान

Ajit Pawar on Manusmriti : एससीईआरटीने नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शालेय शिक्षणाच्या पुस्तकात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. राज्य सरकारकडून मनाचे श्लोक आणि भगवद्गीता तर भारतीय मूल्यांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्यात येणार आहे. या प्रस्तावावर आक्षेप, हरकती आणि सूचना देखील मागवण्यात आल्या आहे. मात्र त्याआधीच वादाला तोंड फुटलं आहे. एनसीईआरटीईच्या या प्रस्तावाला राष्ट्रवाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केलाय. तर शरद पवार यांनी यावरून नाराजी व्यक्त केली. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.

शालेय अभ्यासक्रमात मुलांना भारतीय मूल्यांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा वापर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी संविधान दहन करण्यासाठी मनुस्मृती आणली जाते आहे असा आरोप केला आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या कार्यकारिणीची बैठक बोलताना अजित पवारांनी महत्त्वाचे विधान केले आहे. सत्तेत असेपर्यंत मनु्स्मृतीचा प्रकार होऊ देणार नाही, असे अजित पवारांनी म्हटलं आहे.

"काही ठिकाणी मराठा आणि मराठेत्तर अशा स्वरुपाची निवडणूक झाली. जग, देश कुठे चाललाय आणि आपण कुठे जातीपातीमध्ये अडकून बसतोय. आपण शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा आदर्श समोर ठेवून पुढे जायचं म्हणतो. मनुस्मृतीबाबत छगन भुजबळंनी सांगितले. पण आपण सरकारमध्ये असे पर्यंत कुठल्यालाही परिस्थितीत तसं होऊ देणार नाही. याची तुम्ही काळजी करु नका. ज्या विचारधारेतून आपण पुढे जातोय त्याला कुठेतरी ठेच लागेल असं करणार नाही. मग त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठीमागे हटणार नाही. कुणीतरी पुड्या सोडायचं काम करतंय," असे अजित पवार यांनी म्हटलं.

मनुस्मृती परत आणली जाते आहे - जितेंद्र आव्हाड

“सत्ताधारी पुन्हा एकदा मागच्या दाराने त्यांच्या मनातली गोष्ट पूर्ण करु इच्छित आहेत. आमचं संविधान म्हणजेच मनुस्मृती असं म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय घडतं याचं उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांमध्ये मनुस्मृतीचा समावेश. ज्या मनुस्मृतीने या भारताचं वाटोळं केलं, समाजात दुही माजवली, जातीभेद निर्माण केला, चातुर्वणीय व्यवस्था निर्माण केली. स्त्रियांना सगळ्यात घाणेरडी वागणूक देण्याची पद्धत मनुस्मृतीने जन्माला घातली. ती मनुस्मृती परत आणली जाते आहे.” अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

 

Web Title: Manusmriti will not be allowed as long as we in Power says Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.