Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo: मराठीच्या मुद्द्यावर आज तब्बल २० वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले. वरळीच्या विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ मंचावर एकत्र दिसले. हिंदी सक्तीचा शासन आदेश रद्द करायला लावल्यानंतर आज मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला मुंबईत सुरुवात झाली. या मेळाव्यामध्ये सुरुवातीला राज ठाकरे यांनी भाषण केले. त्यानंतर त्यांचे मोठे चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांचेही भाषण झाले. या दोघांनी मराठीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले आणि जाब विचारला. तब्बल दोन दशके एकमेकांशी वितुष्ट असल्यासारखे वागणारे राज आणि उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय आज एकत्र एकाच मंचावर दिसून आले.
"आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी राजकीय क्षेत्रातील सर्व बड्या नेतेमंडळींना मंचावर बोलावले. त्यांचे आभार मानले आणि त्यांच्याकडून शुभेच्छांचा स्वीकार केला. त्यानंतर राज आणि उद्धव यांचे कुटुंबीय देखील एकाच व्यासपीठावर आले आणि एक उत्तम फॅमिली फोटो दिसला. राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य आणि तेजस ठाकरे सर्वांनी एकत्रित उभे राहून फॅमिली फोटोसाठी पोज दिली.
दरम्यान, भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास ठाकरी शैलीमध्ये जोरदार टोला लगावला आहे. जे बाळासाहेबांना जमलं नाही, इतरांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं आणि आम्हाला एकत्र आणलं, असे राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर भाषण संपल्यानंतर राज यांचे उद्धव यांनी कौतुक केले. राज यांनी आपले दमदार भाषण संपवल्यानंतर ते जागेवर बसण्यासाठी गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज यांचे तोंडभरून कौतुक केले. गेल्या काही वर्षांपासून एकमेकांवर टीका करणारे ठाकरे बंधू यांच्यातील प्रेम दिसून आले. त्यात सुरुवातीला राज ठाकरे आपल्या खुर्चीवर बसायला गेले. त्यावेळी उद्धव यांनी त्यांना हस्तांदोलन केले. त्यानंतर लगेचच ते त्यांच्याशी काहीतरी बोलले आणि अखेर त्यांनी राज यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.