जैन धर्माचे तत्त्वज्ञान जगाला प्रेरणादायी

By Admin | Updated: December 21, 2014 01:49 IST2014-12-21T01:49:21+5:302014-12-21T01:49:21+5:30

जैन धर्माने जगाला मानवता आणि अहिंसेची शिकवण दिली आहे.

The philosophy of Jainism is inspiring to the world | जैन धर्माचे तत्त्वज्ञान जगाला प्रेरणादायी

जैन धर्माचे तत्त्वज्ञान जगाला प्रेरणादायी

कुलगुरू पवार : दक्षिण भारत जैन सभेच्या त्रैवार्षिक अधिवेशनाला प्रारंभ
कोल्हापूर : जैन धर्माने जगाला मानवता आणि अहिंसेची शिकवण दिली आहे. आपली सांस्कृतिक वैशिष्ट्ये जपतानाच शैक्षणिकदृष्ट्या प्रगती साधत समाजाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले औद्योगिक सामर्थ्य निर्माण केले आहे. मानवतेच्या मार्गाने जाताना स्वत:सोबत समाजाचा विकास साधणारे जैन धर्माचे तत्त्वज्ञान जगाला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी केले.
शाहू सांस्कृतिक भवनमध्ये दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने आयोजित ९४ व्या त्रैवार्षिक अधिवेशनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील होते. व्यासपीठावर लक्ष्मीसेन महाराज, महापौर तृप्ती माळवी, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष अ‍ॅड. के. ए. कापसे, नगरसेविका अपर्णा आडके, पद्मजा देशिंगे, महावीर देसाई, सुभाष चौगुले उपस्थित होते.
डॉ. पवार म्हणाले, उन्नतीचा मार्ग शांततेतून आणि शिक्षणातून जातो, हे जैन समाजाने सिद्ध केले आहे. जैन समाजातील सुशिक्षितांची आकडेवारी ८५ टक्के इतकी आहे. शिक्षणामुळे समाजाने आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक सामर्थ्य निर्माण केले आहे; तर दक्षिण भारत जैन सभेने प्रगतीसोबतच आपली संस्कृती जोपासण्याची ताकद समाजाला दिली आहे. तर के. ए. कापसे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी सर्वसामान्य जनतेसाठी शिक्षणाची दारे खुली केली; मात्र अजूनही खेड्यात राहणाऱ्या जैन बांधवांत शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. ते वाढविण्यासाठी शिक्षणासाठी सुसज्ज केंद्रे निर्माण झाली पाहिजेत. ‘एज्युकेशन हब’ व्हायला हवेत.
माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, जैन धर्माला अल्पसंख्याक दर्जा मिळाला हे या वर्षातील सर्वांत मोठे यश आहे. समाजाने आणि सभेने या अल्पसंख्याक दर्जाचा उपयोग शिक्षणासाठी करून घ्यावा. या दर्जाचा अधिकाधिक लाभ समाजातील प्रत्येक मुलापर्यंत कसा पोहोचेल यासाठी सभेने कार्यरत राहावे. आपला समाज शेतीपासून दुरावत आहे. नव्या पिढीला शेतीतील ज्ञान आत्मसात करता यावे, यासाठी अ‍ॅग्रिकल्चर कॉलेज निर्माण केले जावे. स्त्री-भ्रूणहत्या रोखणे व व्यसनमुक्तीस समाजाने पुढाकार घ्यावा. दरम्यान, रावसाहेब पाटील यांचेही यावेळी भाषण झाले़ दिवसभरात दक्षिण भारत महिला परिषद, वीर महिला मंडळ मध्यवर्ती समितीचे अधिवेशन झाले. दुपारनंतरच्या सत्रात पदवीधर संघटनेचे व वीर सेवा दलाच्या मध्यवर्ती समितीचे अधिवेशन झाले. (प्रतिनिधी)

शेती आणि उद्योगाकडे वळा
लक्ष्मीसेन महाराज म्हणाले, दक्षिण भारत जैन सभा ही संस्था १२३ वर्षांपूर्वी एका साधूंनी स्थापन केलेली संस्था आहे. हे करताना त्यांनी मठाने धार्मिक कार्य करावे आणि सभेने शैक्षणिक-सामाजिक कार्य करावे, असे सांगितले. आताची मुलं शिक्षण घेतले की नोकरीकडे वळतात; पण त्याऐवजी शेती आणि उद्योगधंद्यांकडे वळले पाहिजे.

अधिवेशनात आज
सकाळी १० वाजता : दक्षिण भारत जैन सभेची वार्षिक सर्वसाधारण सभा
दुपारी २ वाजता : पुरस्कार वितरण व स्मरणिका प्रकाशन

Web Title: The philosophy of Jainism is inspiring to the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.