"धनंजय मुंडेंची पदावरुन हकालपट्टी करा"; मृत संतोष देशमुखांच्या भावाची हायकोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 09:47 IST2024-12-31T09:33:09+5:302024-12-31T09:47:51+5:30

मंत्री धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढून टाकण्यासाठी मुंबई उच्च न्यायालायत याचिका करण्यात आली आहे.

Petition has been filed with the Aurangabad bench to remove Minister Dhananjay Munde from the ministerial post | "धनंजय मुंडेंची पदावरुन हकालपट्टी करा"; मृत संतोष देशमुखांच्या भावाची हायकोर्टात याचिका

"धनंजय मुंडेंची पदावरुन हकालपट्टी करा"; मृत संतोष देशमुखांच्या भावाची हायकोर्टात याचिका

Dhananjay Munde :बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, राज्यभर निषेध व्यक्त केला जात आहे. या आक्रोशातून गुन्हेगारी आणि राजकारण यांच्यातील एक गुंतागुंतीचा स्पष्ट संबंध समोर येत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा दावा केला जात असून त्याच्या अटकेसाठी सीआयडीकडून शोध सुरु आहे. दुसरीकडे वाल्मिक कराडचा थेट संबंध मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत असल्याचेही म्हटलं जात आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून दूर करण्याची मागणी करण्यात येत आहे. अशातच धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढून टाकण्यासाठी मुंबई उच्च न्यायालायत याचिका करण्यात आली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने बीड जिल्हा हादरला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. मात्र कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार आहे. दुसरीकडे आता थेट धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घेण्यात यावं यासाठी हायकोर्टात क्रिमिनल रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी हायकोर्टाकडे ही मागणी केली आहे.

धनंजय देशमुख यांनी तपासात राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकाकर्त्याने राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर मुख्य आरोपींपैकी एकाशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. तसेच धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची आणि वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी केली. औरंगाबाद खंडपीठासमोर दाखल केलेल्या याचिकेत संतोष देशमुख यांच्या हत्येला जबाबदार असलेल्या गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखाशी संबंध असल्याचा आरोप मुंडे यांच्यावर करण्यात आला आहे. 

याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा बीडमधील एका शक्तिशाली गुन्हेगारी टोळीचे नेतृत्व करतो ज्याला राजकीय संरक्षण मिळते. कराड यांचे मुंडे आणि राज्यातील इतर प्रभावशाली व्यक्तींशी संबंध असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. त्यात मुंडे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी आणि कराड यांच्यावर कठोर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

संतोष देशमुख यांच्या अपहरणाच्या वेळी पोलिसांनी त्वरीत कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. राजकीय दबावानंतरच एफआयआर नोंदवण्यात आल्याचे याचिकाकर्त्याने म्हटलं. सुमारे तीन तासांनंतर, देशमुख यांचा मृतदेह सापडला, ज्यावर अनेक जखमा होत्या. कराड हे आरोपींसोबत व्हिडिओ कॉलवर असताना गुंडांनी संतोषवर अत्याचार केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. कराड याच्याविरुद्ध खंडणी, धमक्या आणि अपहरणाच्या अनेक तक्रारी असूनही, अधिकारी निर्णायक कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही याचिकाकर्त्याने केला आहे. या याचिकेत बीडमधील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेतील अपयशाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Petition has been filed with the Aurangabad bench to remove Minister Dhananjay Munde from the ministerial post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.