जनतेचा बोलण्याचा हक्क हिरावून घेतला जाणार; नव्या विधेयकावरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 14:21 IST2025-03-15T13:57:18+5:302025-03-15T14:21:08+5:30

शासनाला 'पोलीसराज' प्रस्थापित करण्याचे लायसन्स मिळणार आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी या विधेयकावर टीका केली आहे.

Peoples right to speak will be taken away ncp mp Supriya Sule makes serious allegations against the government over the new bill | जनतेचा बोलण्याचा हक्क हिरावून घेतला जाणार; नव्या विधेयकावरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप

जनतेचा बोलण्याचा हक्क हिरावून घेतला जाणार; नव्या विधेयकावरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप

NCP Supriya Sule: राज्य सरकार आणू पाहत असलेल्या एका नव्या विधेयकावरून गंभीर आरोप करत राष्ट्रवादी शदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. "महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी नागरीकांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली करण्यासाठी नवे विधेयक आणायचे ठरविले आहे. या विधेयकाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा शासनाच्या विरोधात बोलण्याचा हक्क हिरावून घेतला जाणार आहे. वास्तविक सुदृढ लोकशाहीत विरोधी मतांचा आदर केला जातो. लोकशाहीचे तत्व विरोधी मतांना देखील महत्वाचे मानते. सत्ताधारी बेलगाम होऊ नयेत, त्यांनी जनमताचा आदर करावा याची दक्षता विरोधी आवाज घेत असतो. परंतु सदर 'महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा' विधेयकात 'बेकायदेशीर कृत्य' ही संकल्पना स्पष्ट करताना शासकीय यंत्रणांना अमर्यादित अधिकार प्रदान केल्याचे दिसते.‌ या माध्यमातून शासनाला 'पोलीसराज' प्रस्थापित करण्याचे लायसन्स मिळणार असून याचा दुरुपयोग शासनाच्या विरोधात असणाऱ्या परंतु लोकशाही मार्गाने, विधायक विरोध व्यक्त करणाऱ्या व्यक्ती, संस्था अगर संघटनांच्या विरोधात होऊ शकतो. आम्ही भारताचे लोक या संकल्पनेला देखील या विधेयकामुळे हरताळ फासला जाणार आहे," असा हल्लाबोल खासदार सुळे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून केला आहे.

या विधेयकावर टीका करताना सुप्रिया सुळे यांनी पुढे म्हटलं आहे की, "प्रशासनाला अमर्याद अधिकार देण्यात येणार असल्याने कोणत्याही व्यक्तीला केवळ सूडबुद्धीने गजाआड करुन त्याला प्रताडीत केले जाऊ शकते. शासनाची धोरणे, निर्णय यांवर टीका करणे किंवा शांततामय मार्गाने त्यासाठी निदर्शने करणे, मोर्चा काढणे बेकायदेशीर कृती म्हणून गृहित धरली जाऊ शकते. नागरिकांच्या घटनादत्त मूलभूत अधिकारांची सरळसरळ पायमल्ली होणार असून या देशातील वैचारिक विविधतेच्या तत्वांचा हे विधेयक सन्मान करत नाही. एवढंच नाही तर काही ठिकाणी न्यायालयीन प्रक्रियेत देखील हस्तक्षेप करण्याचा अधिकार या विधेयकाच्या माध्यमातून शासनाला प्राप्त होणार आहे. याद्वारे न्यायपालिकेच्या सार्वभौमत्वावर देखील हल्ला करण्यात येणार आहे," असा आरोप सुळे यांनी केला आहे.

दरम्यान, "या विधेयकातील काही तरतुदी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटनात्मक स्वातंत्र्य आणि न्यायपूर्ण खटल्याचा अधिकार या घटनेने प्रदान केलेल्या अधिकारांवर थेट प्रहार होणार आहे. अशाच प्रकारचा कायदा (रौलेक्ट ॲक्ट) इंग्रजांनी आपल्या शासनकाळात आणण्याचा प्रयत्न केला होता. संविधानाच्या मूळ तत्वांना नाकारणारे हे विधेयक असून आम्ही त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. शासनाला विनंती आहे की कृपया या विधेयकातील मसुद्याची पुन्हा एकदा समीक्षा करुन त्या माध्यमातून संविधानत्मक मूल्यांचे हनन होणार नाही याची काळजी घ्यावी," असं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी सरकारला केलं आहे.

Web Title: Peoples right to speak will be taken away ncp mp Supriya Sule makes serious allegations against the government over the new bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.