दिघीमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्यानं नागरिकांमध्ये घबराट
By Admin | Updated: April 18, 2017 15:51 IST2017-04-18T15:51:54+5:302017-04-18T15:51:54+5:30
पिंपरी येथील दिघी येथील एका मैदानात ‘डमी सिग्नल बॉम्ब’ आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे

दिघीमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्यानं नागरिकांमध्ये घबराट
ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 18 - दिघी येथील एका मैदानात ‘डमी सिग्नल बॉम्ब’ आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. ही माहिती मिळताच पोलीस आणि लष्करी अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी येथे पाण्याच्या टाकी परिसरात मोकळ्या मैदानात देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरीकडून ‘डमी सिग्नल बॉम्ब’मार्फत सराव केला जातो. सोमवारी देखील सराव करण्यात आला.
या सरावासाठी हे बॉम्ब वापरले जातात. हे डमी बॉम्ब दिसण्यास बॉम्बप्रमाणेच असले तरी त्यामध्ये स्फोटक नसतात. सोमवारी झालेल्या सरावानंतर हे वापरलेले डमी सिग्नल बॉम्ब याठिकाणीच पडलेले होते.
मंगळवारी सकाळी दिघी परिसरातील काही ज्येष्ठ नागरिक येथील मोकळ्या मैदानात ‘मॉर्निंग वॉक’साठी गेले होते. त्यावेळी त्यांना डमी सिग्नल बॉम्ब दिसले. बॉम्ब सदृश्य वस्तू दिसल्याने त्यांनी याबाबत तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांसह लष्करी अधिकारीही दाखल झाले. हे डमी बॉम्ब देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरीचे असल्याने तेथीलही अधिकारी त्याठिकाणी आले. त्यानंतर हे बॉम्ब त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.