भाजपातील लोक भीतीपोटी समोर येऊन बोलत नाहीत!, माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची ‘लोकमत’ला खास मुलाखत
By रवी ताले | Updated: October 18, 2017 04:31 IST2017-10-18T04:25:58+5:302017-10-18T04:31:06+5:30
भारतीय जनता पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते माझ्या भूमिकेशी सहमत असले तरी, ते भीतीपोटी समोर येऊन बोलायला तयार नाहीत, असा दावा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा ‘लोकमत’शी बोलताना केला.

भाजपातील लोक भीतीपोटी समोर येऊन बोलत नाहीत!, माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची ‘लोकमत’ला खास मुलाखत
अकोला : भारतीय जनता पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते माझ्या भूमिकेशी सहमत असले तरी, ते भीतीपोटी समोर येऊन बोलायला तयार नाहीत, असा दावा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा ‘लोकमत’शी बोलताना केला.अकोला येथे एका व्याख्यानासाठी आलेल्या सिन्हा यांनी सध्याच्या राजकारणापासून अर्थकारणापर्यंत अनेक विषयांवर ‘लोकमत’शी संवाद साधला. या मुलाखतीचा संपादित अंश-
प्रश्न: काही दिवसांपूर्वी एका राष्ट्रीय दैनिकात ‘मी आता बोलायलाच हवे!’ या शीर्षकाचा लेख लिहून आपण खळबळ उठवून दिली. ती का?
सिन्हा: मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे. गत अनेक दिवसांपासून देशात जे काही चाललयं ते मी एक मूकदर्शक बनून बघत होतो. पण जे काही होत आहे ते ठीक नाही, याची जाणीव झाल्याने मी तो लेख लिहिला. देशभरातून त्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली. मी नेमके दुख-या नसेवर बोट ठेवले. माझ्या पक्षातील अनेकांनी माझ्या भूमिकेचे स्वागतच केले. तुम्ही पुढाकार घेतला हे बरे केले, अशीच अनेकांची प्रतिक्रिया होती; परंतु पक्षातील लोक कुठे तरी भयभीत आहेत, हे माझ्या लक्षात आले. मी त्यांना सांगतोय, की असे घाबरून चालणार नाही. लोकशाही आणि भय एकत्र नांदू शकत नाहीत. भय झुगारण्याची गरज आहे.
प्रश्न:पक्षातील किती लोक आपल्या सोबत आहेत?
सिन्हा: खूप लोक सहमत आहेत; मात्र ते उघडपणे बोलायला तयार नाहीत. घाबरतात.
प्रश्न: आपण भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीचे निदान केले आहे, तिच्या भवितव्याविषयी मतप्रदर्शन केले आहे. मग स्वपक्षाच्या भविष्याविषयी आपल्याला काय वाटते?
सिन्हा: या विषयावर मी फार टिप्पणी करणार नाही. लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच अवकाश आहे. राजकारणात परिस्थिती अचानक अनुकूल होते, अचानक प्रतिकूल होते. त्यामुळे मी या घडीला त्या संदर्भात भविष्यवाणी करणार नाही; परंतु हे लक्षात घेतले पाहिजे, की आताच आलेल्या बातमीनुसार, भाजपाचा गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पराजय झाला आहे. नांदेड महापालिका निवडणुकीत काय झाले, ते तुम्हाला ज्ञातच आहे. तिथे आमच्या जागा वाढल्या, असे काही लोक म्हणू शकतात. त्यामुळे निवडणूक निकाल सोडून द्या; पण जनतेमध्ये कुठे तरी निराशेची भावना व्याप्त आहे, हे मला सतत जाणवत आहे.
प्रश्न: भाजपात हुकुमशाही आहे, असे आपल्याला वाटते का?
सिन्हा: हुकुमशाही आहे किंवा नाही, ते सोडा; पण तुम्ही बघा, नुकतेच आमचे मित्र अरुण शौरी असे म्हणाले, की अडीच लोक पक्ष आणि सरकार चालवित आहेत. शत्रुघ्न सिन्हाही तेच बोलले, की दोन लोकच पक्ष चालवित आहेत.
प्रश्न: सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेसमोरील सर्वात मोठे आव्हान कोणते?
सिन्हा: मला वाटते, ‘बँकांचे नॉन परफॉर्मिंग असेट्स’ म्ह्णजेच फसलेली कर्जे, ही सर्वात मोठी समस्या आहे. गेल्या साडेतीन वर्षात आम्ही एनपीए नियंत्रणात आणू शकलेलो नाही. त्यामुळेच खासगी क्षेत्राकडून गुंतवणूक वाढलेली नाही.
प्रश्न: आपल्या सध्याच्या हालचाली आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या १९८७-८८ मधील हालचाली, यामध्ये बरेच साम्य दिसते.
सिन्हा: (हसत हसत) तुम्ही खूप पुढचा विचार करीत आहात!