दंडवसुलीही आॅनलाइन
By Admin | Updated: February 21, 2015 01:10 IST2015-02-21T01:10:18+5:302015-02-21T01:10:18+5:30
वाहनचालकांना शिट्टी फुंकून थांबवायचे, बाजूला घ्यायचे आणि पावती फाडून दंडवसुली करायची हे सर्व आता मुंबईपुरतेतरी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.

दंडवसुलीही आॅनलाइन
डिप्पी वांकाणी ल्ल मुंबई
चौकात उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसाने सिग्नल तोडून पुढे धावणाऱ्या किंवा वाहतूक नियमांचे अन्य प्रकारे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना शिट्टी फुंकून थांबवायचे, बाजूला घ्यायचे आणि पावती फाडून दंडवसुली करायची हे सर्व आता मुंबईपुरतेतरी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.
या पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीत पांढरा डगला घातलेला वाहतूक पोलीस जे काम करायचा तेच काम नव्या पद्धतीत अत्याधुनिक कॅमेरा करेल. नियम मोडणाऱ्या वाहनांची हा कॅमेरा जागीच नोंद घेईल, त्या वाहनाच्या नंबरप्लेटवरून मालकाची ओळख पटेल, त्याच्या नावे संबंधित गुन्ह्याचे ‘डिजिटल चलन’ लगेच तयार होईल आणि ते संबंधितास एसएमएसने किंवा ई-मेलने पाठविले जाईल.
या चलनानुसार आकारलेल्या दंडाचा भरणा आॅनलाइन भरण्याचीही व्यवस्था असेल. थोडक्यात वाहतूक पोलिसांच्या कामाचा हा सर्व भाग या नव्या पद्धतीत मानवरहित पद्धतीने पार पाडला जाईल. ही अद्ययावत यंत्रणा राबविण्यासाठी खास वाहतूक पोलिसांसाठी ५०० अत्याधुनिक कॅमेरे घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मंजुरी दिली आहे.
पोलीस सहआयुक्त बी. के. उपाध्याय यांनी ही माहिती देताना ‘लोकमत’ला सांगितले की, मुंबईच्या वाहतूक समस्येसंबंधी आमची अलीकडेच मुख्यमंत्र्यांशी खास बैठक झाली. मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवरील हालचालींवर निरंतर लक्ष ठेवण्यासाठी शहराच्या विविध भागांत ६ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. पण या कॅमेऱ्यांची निगराणी ‘विहंगम’ स्वरूपाची असेल व त्यांचा वाहतूक पोलिसांना काहीच उपयोग होणार नाही, ही बाब आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणली.
उपाध्याय म्हणाले की, शहराच्या सर्वसाधारण पोलिसी गरजांसाठी दिल्या जाणाऱ्या कॅमेऱ्यांखेरीज खास वाहतूक पोलिसांसाठी वेगळे ५०० कॅमेरे देण्याची विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली. ती त्यांनी तत्त्वत: मान्य केली आहे. या कॅमेऱ्यांची स्थिती स्थिर नसेल. ते गरजेनुसार मागे-पुढे झुकू शकतील किंवा आजूबाजूला फिरू शकतील. नियम मोडमाऱ्या वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर व चालकाचे छायाचित्रही हे कॅमेरे जागच्या जागी टिपू शकतील.
हे कॅमेरे वाहतूक नियमनासाठी कुठे बसवायचे त्याची नक्की ठिकाणेही आम्ही ठरविली आहेत, असे सांगून उपाध्याय म्हणाले की, सध्या वाहतूक पोलिसांकडून प्रत्यक्षात होणारे वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचे गुन्हे जेमतेम २५-३० टक्केच पकडले जातात. पण हेच काम कॅमेऱ्यांकडून केले जाईल तेव्हा एरवी मानवी नजरेतून सुटणारी वाहतूक नियमांची बारीक-सारीक उल्लंघनेही टिपली जातील व गुन्हेगारांवर कारवाई करता येईल.
वाहतूक पोलिसांनी मांडलेल्या या योजनेस मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शविली, एवढेच नव्हेतर त्याची गरजही स्वत:च अधोरेखित केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी इतर काही देशांची उदाहरणे दिली आणि सांगितले की, तेथे रस्त्यांवर वाहतुकीची दाटी आपल्यापेक्षा जास्त असूनही नागरिक नियम मोडत नाहीत; कारण कॅमेऱ्यांची त्यांच्यावर सतत नजर असते. लवकरच आपल्या रस्त्यांवरही अशी सुसज्ज यंत्रणा उभी राहत असल्याने चाकरमान्यांचा रोजचा त्रास कमी होणार आहे.
च्वाहतूक पोलिसांनी प्रस्तावित केलेली ही नवी यंत्रणा स्वचलित असेल व त्यात मानवी सहभाग फारच थोडा असेल. चौकांमध्ये मोक्याच्या ठिकाणी बसविलेले अत्याधुनिक व शक्तिशाली कॅमेरे वाहतुकीवर नजर ठेवतील.
च्वाहतूक नियमांचे उल्लंघन लगेच कॅमेऱ्यात टिपले जाईल. कॅमेरा वाहनाची नंबरप्लेटही टिपेल. शहरभरातील कॅमेऱ्यांनी टिपलेली माहिती त्याच वेळी एका मध्यवर्ती सर्व्हरकडे पाठविली जाईल.
च्वाहनाच्या नोंदणी क्रमांकावरून त्याच्या मालकाची माहिती लगेच कळेल.
च्वाहनमालकास लगेच एसएमएस किंवा ई-मेलने घडलेल्या गुन्ह्याबद्दल दंड आकारणीचे चलन पाठविले जाईल.
च्हा दंड भरण्यासाठी ठरावीक कालावधी ठरवून दिला जाईल.