पातूरच्या कांद्याचे राज्यभरात नाव!
By Admin | Updated: June 24, 2015 01:33 IST2015-06-24T01:33:55+5:302015-06-24T01:33:55+5:30
आयसीएआरने दिला द्वितीय क्रमांक.

पातूरच्या कांद्याचे राज्यभरात नाव!
अकोला : अकोला जिल्हय़ातील पातूर तालुक्यातील देऊळगावचे शेतकरी नामदेवराव अढाऊ यांनी एका एकरात २१ टन कांद्याचे विक्रमी उत्पादन घेऊन कांदा उत्पादनाकडे शेतकर्यांचे लक्ष केंद्रित केले आहे. या पांढर्या शुभ्र कांद्याचे उत्पादन वाढतच असून,भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कांदा स्पर्धेत या कांद्याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राजगुरू नगर, पुणे येथील राष्ट्रीय कांदा व लसूून संचालनालयाच्यावतीने १६ जून रोजी राज्यस्तरीय कांदा स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत पातूरच्या कांद्याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. प्रथम क्रमांक मराठवाड्यातील बीड जिल्हय़ाचे शेतकरी बाबासाहेब पिसोरे त्यांच्या शेतातील कांद्याला मिळाला आहे.
गतवर्षी या कांद्यापासून अढावू यांना २.५0 लाख रुपये निव्वळ नफा झाला होता. त्यांच्या यशानंतर या तालुक्यातील शेतकर्यांनी ७५0 एकरावर कांद्याची लागवड केली. शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून आता शेतकरी कांदा बीजोत्पादनाकडे वळले आहेत. याची भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) दखल घेतली आणि अढावू यांची यशोगाथा त्यांच्या संकेतस्थळावर, मुख्यपृष्ठावर प्रकाशित केलेली आहे. अढाऊ हे पारंपरिक पद्धतीने १.२५ एकरावर कांद्याची लागवड करीत होते. अपेक्षेनुसार त्यांना उत्पन्न होत नसल्यामुळे त्यांनी कांदा व अद्रक संशोधन केंद्र, हैदराबाद यांनी संशोधन केलेले वाण ह्यभीमा शुभ्रह्ण या पांढर्या कांद्याची लागवड केली. या वाणाची खरीप हंगामासाठी शिफारस करण्यात आली आहे. अढाऊ यांना एक एकर क्षेत्रातून २१ टन कांद्याचे उत्पादन मिळाले होते. या कांद्याचा आकार एकसारखा आहे, हे विशेष. त्यांना २.५0 लाखांचा निव्वळ नफा झाला. या वाणाची महती त्यांनी ३00 शेतकर्यांना समजावून सांगितली. त्यामुळे ७५0 एकरावर या कांद्याची पेरणी शेतकर्यांनी केली असून, चांगले उत्पादन घेतले आहे. अढाऊ यांच्या कांदा बीजोत्पादनाची या राज्यासह देशात मागणी वाढली आहे.
*राष्ट्रपतींनी केली प्रशंसा
अढाऊ यांनी हा कांदा नागपूर येथील वसंत कृषी प्रदर्शनात ठेवला होता. त्यांच्या स्टॉलला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भेट दिली असता, या कांद्याची गुणवत्ता बघून राष्ट्रपतींनी प्रशंसा केली होती. या वाणास त्यांनी कांद्याचा राजा असे संबोधित केले होते.