जाधव यांच्या आमदारकीबाबत अर्धवट माहिती
By Admin | Updated: February 22, 2015 01:33 IST2015-02-22T01:33:59+5:302015-02-22T01:33:59+5:30
दिलेल्या स्थगितीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचा जाधव यांचा दावा दिशाभूल करणार आहे, असा आरोप शिवसेनेचे अॅड. शिवाजी सहाणे यांनी केला आहे.

जाधव यांच्या आमदारकीबाबत अर्धवट माहिती
नाशिक : विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत जाधव यांची आमदारकी रद्द करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचा जाधव यांचा दावा दिशाभूल करणार आहे, असा आरोप शिवसेनेचे अॅड. शिवाजी सहाणे यांनी केला आहे.
उच्च न्यायालयाने स्वत:च्या निर्णयाच्या अंमलबजावणीला ९ मार्चपर्यंत स्थगिती दिली असल्याने आता त्यावर सर्वोच्च न्यायालय कशी स्थगिती देऊ शकेल, असा प्रश्न सहाणे यांनी केला आहे.
विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जयंत जाधव विजयी झाले. त्यामुळे पराभूत शिवसेनेचे उमेदवार अॅड. शिवाजी सहाणे यांनी त्यास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानुसार १३ जानेवारीस उच्च न्यायालयाने जयंत जाधव यांची आमदारकी रद्द ठरवून अॅड. सहाणे यांना विजयी घोषित केले. परंतु जाधव यांना सर्वोच्च न्यायालयात अपील करता यावे यासाठी आठ आठवड्यांची म्हणजेच ९ मार्चपर्यंत मुदत दिली. त्यामुळे जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. परंतु अगोदरच न्यायालयाने जाधव यांच्या आमदारकीसंदर्भात दिलासा दिला असल्याने नव्याने स्थगितीवर पुन्हा स्थगिती कशी मिळणार, असा प्रश्न सहाणे यांनी केला आहे. जाधव यांनी सर्वोच्च न्यायलयात दावा दाखल केल्यानंतर न्यायालयाने ११ मार्च रोजी सुनावणी ठेवली होती, परंतु जाधव यांच्या वकिलांच्या विनंतीवरून १८ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.