'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
By अतुल कुलकर्णी | Updated: November 8, 2025 12:15 IST2025-11-08T12:15:10+5:302025-11-08T12:15:44+5:30
"५००च्या स्टॅम्पवर कुठे अशा नोंदी होतात का?"

'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
अतुल कुलकर्णी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पुण्याचे जमीन विक्रीचे जे प्रकरण समोर आले आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. पाचशे रुपयात अशा कुठे नोंदी होतात का? सरकारमध्ये काही नियम आहेत की नाही? सत्तेचा दुरुपयोग किती करावा? असे रोखठोक सवाल माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केले. या प्रकरणाची फाइल आपल्याकडे आली होती, मात्र आपण ती नाकारल्याचेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात आले आहे. याविषयी महसूल मंत्री असताना तुमच्या काळात काय घडले होते? असा सवाल केला असता थोरात म्हणाले, या विषयाची फाइल माझ्याकडे तीन वेळा आली होती. तिन्ही वेळा मी ही फाइल नाकारली होती. नंतर संबंधित लोक उच्च न्यायालयातही गेले. उच्च न्यायालयानेही हे प्रकरण नाकारले होते. पुन्हा हे प्रकरण आपल्यासमोर आणण्यात आले. त्यावेळी आम्ही उच्च न्यायालयात गेलो होतो, हे आपल्यापासून लपवून ठेवले होते. मात्र, तपशिलात गेल्यानंतर ते समोर आले. अर्धन्यायिक आणि प्रशासकीय दोन्ही पातळीवर या विषयाची फाइल मी नाकारली होती. नंतरच्या काळात ही फाइल ज्या महसूल मंत्र्यांकडे गेली, त्यांनी कुठलाही निर्णय न देता ती फाइल तशीच ठेवल्याची आपली माहिती असल्याचे थोरात म्हणाले.
जे काही झाले, ते पूर्णपणे चुकीचे
सामान्य माणसाने कायदेशीररित्या नोंदणी करायची किंवा केलेली नोंदणी रद्द करायची ठरवली तर त्याला अनेक चकरा माराव्या लागतात. या प्रकरणात सगळ्याच गोष्टी इतक्या पटापट कशा झाल्या? असे विचारले असता थोरात म्हणाले, याचे उत्तर ज्यांनी कोणी या प्रकरणात दबाव आणला तेच देऊ शकतील.
दुर्दैवाने आपल्याकडे सर्वसामान्यांसाठी एक आणि प्रभावी नेत्यांसाठी एक अशी वागणूक मिळते. उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव यात आल्यामुळे यंत्रणा कशी गतीने हलते, हे सामान्य माणूसही सांगू शकतो. या प्रकरणात जे काही झाले आहे ते पूर्णपणे चुकीचे झाले आहे. अगदी निर्णय रद्द करण्याची घाईदेखील, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.
बारामतीतही जमिनी बळकावल्याचा बसपचा आरोप
बसपाचे प्रदेश महासचिव काळुराम चौधरी यांनी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महार वतनाच्या जमिनी त्यांच्या हस्तकांच्या नावे बळकावल्याचा आरोप केला. यामध्ये बऱ्याच महसूल अधिकाऱ्यांचा सहभाग असून याबाबत चौकशी करून कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी पत्र पाठविल्याचे सांगितले.
पार्थ पवार यांच्या कंपनीमार्फत झालेला जमीन व्यवहार पूर्णत: बेकायदेशीर आहे. हा घोटाळा एक लाख कोटींपेक्षा अधिक आहे. मी लोकलेखा समितीवर असताना या प्रकरणाचे अनेक पुरावे हाती आले. त्यामुळे पुण्यात लवकरच पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा भंडाफोड करणार.
- विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते
पुण्यातील कथीत जमीन खरेदी प्रकरणात प्राथमिक चौकशीत संबंधितांवर गुन्हे दाखल झाले आहेत; परंतु पार्थ पवार यांचा यात समावेश नाही. या प्रकरणाची पूर्ण चौकशी होऊ द्यावी. त्यानंतर नेमके सत्य समोर येईल. समिती एक महिन्यात अहवाल देईल, त्यानंतर अंतिम कारवाई होईल.
- चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री