पनवेलचे युसूफ मेहरअली सेंटर झाले पोरके; रायगड जिल्ह्यात रुजविली गांधीवादासह स्वदेशी अन् समाजसेवेची पाळेमुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 07:36 IST2025-10-03T07:36:02+5:302025-10-03T07:36:15+5:30
केंद्रीत अर्थव्यवस्थेला तोंड कसे देणार? भांडवलदारीच्या विरोधात कसे उभे राहणार? हा डॉक्टर जी. जी. पारीख यांचा प्रश्न असायचा. ग्रामोद्योग खादी यांचे एक जाळे देशभरात निर्माण व्हावे. जसे कॉर्पोरेट सेक्टर काम करते त्याप्रमाणे या खादी ग्रामोद्योग क्षेत्राने काम केले पाहिजे. त्यासाठी भांडवल लागेल. ते लोकांकडून गोळा केले पाहिजे व खादी एक चळवळ व्हावी, असे प्रयत्न केले पाहिजे. हे त्यांचे सतत म्हणणे होते.

पनवेलचे युसूफ मेहरअली सेंटर झाले पोरके; रायगड जिल्ह्यात रुजविली गांधीवादासह स्वदेशी अन् समाजसेवेची पाळेमुळे
वैभव गायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : स्वदेशीचा नारा देणारे जी. जी. पारीख यांनी पनवेल तालुक्यात युसूफ मेहर अली सेंटरची स्थापना १९६१ साली केली. गांधीवाद, स्वदेशी, समाजसेवेची पाळेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात रोवलेला युसूफ मेअर अली सेंटर गुरुवारी जीजींच्या जाण्याने पोरका झाले आहे. गांधी जयंतीच्या दिवशीच या आधुनिक गांधीने आपली जीवनयात्र संपविली, हाच काय तो दैवदुर्विलास. जी. जीं.च्या जाण्याने संपूर्ण युसूफ मेहर अली सेंटर शोकसागरात बुडाले आहे.
पनवेल तालुक्यात पुरोगामी चळवळीचे केंद्र म्हणून युसूफ मेअर अली सेंटर देशभरात प्रसिद्ध आहे. बाल संस्कार शिबिरापासून ते राष्ट्रीय युवा नेतृत्व शिबिरात प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात देशभरातील नागरिकांचा ओघ या ठिकाणी आहे. १५ एकर परिसरात पसरलेल्या या सेंटरमध्ये सेंद्रिय शेती, गांधीजींच्या स्मरणार्थ बापू कुटी, साबण निर्मिती केंद्र, तेलघाणी, कुंभारकाम, गांडूळखत निर्मिती केंद्र याव्यतिरिक्त ज्या तारा गावालगत हे केंद्र आहे.
एकविसाव्या शतकातही स्वदेशी वस्तूची निर्मिती
पारीखांची शंभरी याच केंद्रात मोठ्या उत्साहात समाजोपयोगी कामांच्या माध्यमातून मागच्याच वर्षी पार पडली. केवळ समाजोपयोगी कामे नाहीत, तर गरीब, आदिवासी गरजूंना रोजगार, शासकीय योजनांच्या माहितीसाठी वेळप्रसंगी त्यांच्यासाठी लढे देण्याचे काम येथील स्वयंसेवक अविरतपणे आजही करीत आहेत. स्वदेशीचा नारा गांधीजींनी दिल्यानंतर एकविसाव्या शतकातही या केंद्रात स्वदेशी वस्तूची निर्मिती आणि विक्री केली जात आहे.
११ राज्यांतील शाखांद्वारे दिनदुबळ्यांना आधार
देशातील ११ राज्यांमध्ये सेंटरच्या शाखा निर्माण करून हजारो दिनदुबळ्यांचे आधार बनलेले गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. जी. जी. पारीख यांच्या जाण्याने सेंटर पोरका झाल्याचे पनवेलमधील तारा येथील सेंटरमधील कर्मचारी, स्वयंसेवक सांगत आहेत. जी.जीं.चे या सेंटरवर विशेष प्रेम असल्याने ते नेहमी या केंद्राला भेट देत असत. विशेष म्हणजे येथील स्वयंसेवकाशी संवाद साधून आपुलकीने संपूर्ण सेंटरची कुतूहलाने पाहणी करीत असत.
पर्यटकांसाठीदेखील आकर्षण
कोंकणाकडून मुंबईकडे जाताना मुंबई-गोवा महामार्गावर हे केंद्र कर्नाळाच्या कुशीत बांधनवाडी येथे आहे. या केंद्रात दिवाळीच्या काळात मातीचे लामण दिवे घेण्यास नेहमी गर्दी असते. याव्यतिरिक्त साबण, लाकडी घाण्यातील तेल खरेदीसाठी पर्यटक आवर्जून याठिकाणी हजेरी लावतात. वर्षभरात युसूफ मेअर अली सेंटरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या ८० हजारांच्या घरात आहे.