Suresh Dhan Prajakta mali : 'वीटभट्ट्या, जमीन बळकावून प्रचंड पैसा मिळवत इव्हेंट मॅनेजमेंट केले जाते. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना इथे (परळी) आणले जाते.' या भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या विधानावर प्राजक्ता माळीने आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. प्राजक्ता माळी या सगळ्या प्रकरणावर भाष्य केल्यानंतर राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातून निषेधाच्या प्रतिक्रिया उमटल्या. कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनीही या सगळ्यावर संताप व्यक्त केला.
राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या समर्थनार्थ समोर येत आमदार सुरेश धसांच्या विधानाबद्दल अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. पंकजा मुंडे यांनीही सुरेश धस यांचा उल्लेख केला नाही.
पंकजा मुंडे काय बोलल्या?
"शक्ती' शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची. 'दुर्दैवी घटना' हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे. भावना कुठे आहेत?", असा सवाल पंकजा मुंडेंनी केला.
"चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निर्घृण हत्या या थांबवणे शक्य आहे ,ना पण कायद्याने, नियमाने!! ते राहिले बाजूला नुसती चिखल फेक... दुर्दैवाने सॉफ्ट टार्गेट (soft target) आहे स्त्री आणि तिचे सत्व...", अशी उद्विग्न प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
"काल पाहवलं नाही. पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे? तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी", असे भाष्य पंकजा मुंडे यांनी केले आहे.
प्राजक्ता माळी सुरेश धसांच्या विधानावर काय बोलली होती?
"लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न मांडावेत, त्यांच्या हक्काचे रक्षण करावे. महाराष्ट्रातील राजकारण्यांना हे शोभत नाही. आमदार सुरेश धस यांनी माझ्याबद्दल जी टिप्पणी केली आहे, त्याबद्दल माफी मागावी. तुमच्या राजकारणात कलाकारांना का खेचता? तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ असो. बीडमधील कायदा-सुव्यवस्थेवर बोलताना तुमची गाडी आमच्यावर का घसरते? आम्ही कष्टाने मोठे झालो, नाव कमावले, आमची प्रतिमा का डागाळता", असे सवाल प्राजक्ता माळीने आमदार सुरेश धस यांना केले.