मुंबई : अटकेपार झेंडा फडकावण्यास गेलेल्या सदाशिव भाऊंच्या नेतृत्वाखालील मराठ्यांचा पानिपतच्या लढाईत जसा दारुण पराभव झाला, अगदी तशीच अवस्था मोदींच्या त्सुनामीने राज्यात काँग्रेसची केली आहे. काँग्रेसचे नवखे उमेदवार तर हरलेच, पण सुशीलकुमार शिंदे, गुरुदास कामत, शिवाजीराव मोघेंसारख्या अनेक दिग्गजांचाही दारुण पराभव झाला. जिथे काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, त्या मुंबई शहरात तर काँग्रेस अक्षरश: भुईसपाट झाली. केवळ मराठवाड्यातील अशोक चव्हाण आणि राजीव सातव या दोघांनी पक्षाची लाज राखली. गेले दशकभर दिल्लीच्या तख्ताकडे डोळे लावून बसलेल्या शरद पवार यांच्या राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची आठ जागांवरून चार जागांवर घसरण झाली. मोदींच्या पाठिंब्यासाठी आतुरलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेसह भारिप, शेकाप, आम आदमी, बसपा, सपा, डावे या सगळ्यांना भोपळाही फोडता आला नाही. महायुतीने सर्वाधिक ४१ जागा मिळवून राज्यातील ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. विदर्भ, खान्देश, उत्तर महाराष्टÑ आणि मुंबईतील सर्वच्या सर्व जागा महायुतीने जिंकल्या आहेत. रिपाइंसाठी सोडलेल्या सातारा मतदारसंघात मात्र सेनेला अपयश आले. राज्यातील एकूण १७ विद्यमान खासदारांसह दोन खासदार पुत्रांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. काँग्रेसने २६ जागांवर ही निवडणूक लढवली. त्यापैकी केवळ नांदेडला अशोक चव्हाण व हिंगोलीला राजीव सातव यांच्या रूपाने काँग्रेसचे अस्तित्व राहिले आहे. १९६२पासूनच्या आजवरच्या सर्व निवडणुकांत काँग्रेस, राष्टÑवादीची ही राज्यातील नीचांकी कामगिरी आहे.
राज्यात काँग्रेसचे पानिपत
By admin | Updated: May 17, 2014 02:52 IST