पंढरपूर वारी २०१९ : भूमीला वंदन करत, कपाळी मातीचा टिळा लावत धर्मपुरीत आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 20:58 IST2019-07-06T20:40:24+5:302019-07-06T20:58:47+5:30
ज्ञानोबा तुकाराम, माऊली माऊलीच्या जयघोषात आणि टाळ मृदूंगाच्या गजरात मोठ्या आनंदात धर्मपुरीच्या भूमीत दाखल झाली.

पंढरपूर वारी २०१९ : भूमीला वंदन करत, कपाळी मातीचा टिळा लावत धर्मपुरीत आगमन
नातेपुते : उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीन !
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, पायरीसी होवू दंग गावूनी अभंग !...... ज्ञानोबा तुकाराम, माऊली माऊलीच्या जयघोषात आणि टाळ मृदुगांच्या गजरात मोठ्या आनंदात धर्मपुरीच्या भूमीला वंदन करत, कपाळी मातीचा टिळा लावत सोलापुर जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचे आगमन झाले.
धर्मपुरी प्रवेशाची आस लागून राहिलेला माऊलींचा पालखी सोहळा बरड गावच्या मुक्कानंतर पहिला विसावा साधुबुवाचा ओढा, धर्मपुरी कॅनॉल येथे दुपारचे भोजन आणि विसावा घेत, शिंगणापूर फाटा, पानसरकरवाडीत तिसरा विसावा घेऊन नातेपुते येथे विसावला.
सोलापूर जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराजवळ रांगोळ्यांच्या पायगड्या घालून भव्य स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारल्या होत्या. प्रवेशद्वाराजवळ मंडप उभारला होता. भारुड, शाहिरी, कीर्तनाच्या माध्यमातून पर्यावरण आणि इतर विविध विषयांवर प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
वारकरी धर्मपुरीत येताच भूमीला वंदन करत होते.
प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी उत्तम नियोजन केले होते. वाहतुकी नियंत्रणासाठी रस्त्याच्या दुरतर्फा पोलिस कर्मचारी ऊभे होते. त्यामुळे वाहतुक नियोजन योग्य प्रकारे होत होते. पोलिस बँड पथकाने महाराष्ट्र गीताचे सादरीकरण केले.
संध्या साखी यांचे भारुड 'पर्यावरणची वारी, पंढरीच्या दारी' या संकल्पनेतुन पर्यावरण जागृती करण्यात आली. सदरची संकल्पना पर्यावरण मंत्र्यालयाकडून राबविली जात आहे. तसेच 'वारी नारी शक्तीची' ही संकल्पना सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून राबविली जात आहे.
सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे वरुण राजा माऊलींच्या स्वागताला हजेरी लावणार असे वाटत होते. मात्र दुपारच्या भोजनानंतर त्याने हलक्या सरींची सलामी दिली.
प्रवेशाच्या ठिकाणी स्वछता गृहांची व्यवस्था करण्यात आली नसल्याने वारकऱ्यांची गैरसोय होत होती. प्रवेशद्वाराजवळ आणि पालखी विसाव्याच्या ठिकाणी स्वच्छता गृहांची सोय करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली.
आतुरता पहिल्या गोल रिंगणाची
माऊलींच्या पालखीचे पाहिले गोल रिंगण आज दुपारी पुरंदावडे येथे होणार आहे. धर्मपूरीत पोहचल्याचा आनंद असतानाच गोल रिंगणाची आतुरता वारकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. त्यांनतर माळशिरस येथे पालखी मुक्कामी विसावणार आहे.