पालघरपोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. हा व्यक्ती स्वतःला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेत अधिकारी असल्याचे सांगून महिलांना फसवत होता. अशाच पद्धतीने फसवून आरोपीने एका तरुणीवर बलात्कार केला. आरोपीला पोलिसांनी अहमदाबाद येथून अटक केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय हिमांशु योगेशभाई पंचाल असे आरोपीचे नाव आहे. हिमांशु मॅट्रिमोनियल साईटवरून तरुणी आणि महिलांशी मैत्री करायचा. तो स्वतः दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे सांगायचा.
तरुणींचा विश्वास संपादन करू करायचा अत्याचार
तरुणींना लग्नाचे स्वप्न दाखवायचा. त्यांना तसे वचन देऊन विश्वास संपादन करायचा आणि भेटायला बोलवायचा. तरुणींना हॉटेल वा लॉजवर घेऊन जायचा आणि त्यांच्यावर बलात्कार करायचा, असे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
पालघरमधील वालीव पोलीस ठाण्यात एका महिलेने हिमांशु विरोधात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
महिलेला आरोपीने कसे फसवले?
पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, मैत्री झाल्यानंतर आरोपीने लग्नाचं वचन दिले. त्यानंतर भेटायला बोलवले आणि हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केला. आरोपीने बनावट हिराही भेट देऊन महागडे गिफ्ट देण्याचे नाटक केले.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यात असे आढळून आले की, आरोपी हिमांशुने जवळपास एक डझनपेक्षा जास्त महिलांना अशाच पद्धतीने फसवले आणि अत्याचार केला आहे. आरोपी महिलांसोबत मैत्री करून त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित करायचा आणि धोका देऊन गायब व्हायचा.
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीचा शोध सुरू केला. तो गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला अहमदाबादमधून अटक केली. आता पोलीस हिमांशु विरोधात आतापर्यंत दाखल झालेल्या तक्रारी आणि गुन्ह्यांचाही चौकशी करत आहेत.