पिंपरी चिंचवडमधील पाणी पुरवठा विभागातील लाचखोर अधिकार गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 14:24 IST2017-07-31T14:23:45+5:302017-07-31T14:24:42+5:30
बिल काढून देतो, असे सांगून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणी पुरवठा विभागाचे लेखाधिकारी के. बी. शिंगे ( वय 51 वर्ष ) याला दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास एसीबीच्या पथकाने अटक केली.

पिंपरी चिंचवडमधील पाणी पुरवठा विभागातील लाचखोर अधिकार गजाआड
पिंपरी-चिंचवड, दि. 31 - बिल काढून देतो, असे सांगून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणी पुरवठा विभागाचे लेखाधिकारी के. बी. शिंगे ( वय 51 वर्ष ) याला दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास एसीबीच्या पथकाने अटक केली. लाचखोरांना रंगेहाथ पकडण्याची गेल्या सात महिन्यातील ही पाचवी कारवाई आहे. आजपर्यंत सहा जण एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत.
पिंपरी महापालिकेतील टक्केवारीचे प्रकरणे गाजत आहेत. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडेही तक्रारी झाल्या आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, महापालिकेतील पाणी पुरवठा विभागात शिंगे लेखाधिकारी म्हणून काम करतात. तक्रारदार हे महापालिकेचे एक ठेकेदार आहे. विभागातील मेंटेनन्सची फाईल क्लिअर करण्यासाठी, बिल काढून देण्यासाठी शिंगे यांनी तक्रारदारास एक हजार रुपयांची लाच मागितली होती.
त्यानंतर ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने महापालिका भवनाच्या क्षेत्रात दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास एसीबीच्या पथकाने शिंगे यांना रंगेहात पकडले. महापालिकेतील टक्केवारीचे प्रकरण गाजत असतानाच गेल्या 7 महिन्यात एसीबीच्या जाळ्यात आजपर्यंत सहा जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
22 मार्च रोजी महापालिकेच्या शिक्षण मंडळातील बाबासाहेब राठोड यांना 20 हजार रुपयांची लाच घेताना पकडले होते. त्याच दिवशी प्रभारी शिक्षण अधिकारी अलका कांबळे यांनाही 20 हजार रुपयांचा लाच घेताना रंगेहात पकडले होते. त्यानंतर २४ एप्रिल रोजी आयुक्त दिनेश वाघमारे यांचा स्वीय्य सहायक राजेंद्र शिर्के यास 12 लाख रुपयांची लाच घेताना महापालिका भवनात पकडले होते. त्यानंतर अतिक्रमण विभागातील २७ एप्रिलला अजय सिन्नरकर यांस सहा हजार रुपयांची लाच घेताना पकडले होते. १३ मे रोजी आरोग्य विभागातील सहायक आरोग्यधिकारी तानाजी दाते यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. त्यानंतर पाणीपुरवठा विभागातील शिंगे यांना पकडले आहे. एकूण पाच कारवायांमध्ये सहा जणांना एसीबीने पकडले आहे.