डॉ. श्रीराम लागू यांना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 23:02 IST2019-12-17T22:53:50+5:302019-12-17T23:02:37+5:30
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. लागू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

डॉ. श्रीराम लागू यांना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
मुंबई - आपल्या प्रभावी अभिनयाने दीर्घकाळ नाट्य आणि चित्रपट क्षेत्र गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे आज निधन झाले. डॉ. लागू यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्सृष्टीवर दु:खाचे सावट पसरले आहे. दरम्यान, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. लागू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनय क्षेत्राला उत्तुंग उंचीवर नेणारा कलाकार हरपला
मराठी रंगभूमीला आणि अभिनय क्षेत्राला उत्तुंग उंचीवर नेणारे कलाकार आज आपल्यातून निघून गेले. अशा दिग्गज कलाकाराला आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो.
- सुभाष देसाई, सांस्कृतिक मंत्री
डॉ. लागू म्हणजे अभिनय जगतातील 'सिंहासन'
गेली अनेक दशके सिनेमा, नाट्य क्षेत्राच्या माध्यमातून मराठी आणि हिंदी रसिकजनांवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे आपल्यातून निघून जाणे अतिशय दुःखद आहे. डॉ. लागू हे अभिनय जगतातील 'सिंहासन' होते. या 'कलेच्या चंद्रा'ने 'सामना', 'पिंजरा' असे अनेक चित्रपट गाजवले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त अंधश्रद्धा निर्मुलनासह अनेक सामाजिक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले. अण्णा हजारे यांच्या लढ्यातही त्यांचा वाटा होता. मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टी सुद्धा त्यांनी गाजवली. त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या, आप्तस्वकियांच्या, कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
डॉ. लागू हे अभिनय जगतातील 'सिंहासन' होते. या 'कलेच्या चंद्रा'ने 'सामना', 'पिंजरा' असे अनेक चित्रपट गाजवले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 17, 2019
एका नटसम्राटाची एक्झिट
नटश्रेष्ठ डॉ. श्रीराम लागु यांच्या निधनाने एका नटसम्राटाची एक्झिट झाली असल्याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या बळावर दीर्घकाळ मराठी रंगभूमी तसेच मराठी व हिंदी चित्रपट सृष्टी गाजविणारे डॉ श्रीराम लागु यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत. वि. वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राट या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तिरेखा डॉ लागुंनी घराघरापर्यंत मनामनापर्यंत पोचवली. लमाण हे त्यांचे आत्मचरित्र प्रत्येक कलावंतासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले .. त्यांच्या निधनाने मराठी नाट्य तसेच चित्रपट सृष्टीची तसेच हिंदी चित्रपट सृष्टीची अपरिमित हानी झाली असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. - आ. सुधीर मुनगंटीवार
चित्रपट आणि नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड
ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनामुळे चित्रपट आणि नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड गेले आहेत. डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली! - बाळासाहेब थोरात
ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनामुळे चित्रपट आणि नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड गेले आहेत. डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/RkBRSyO13a
— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 17, 2019
श्रेष्ठ अभिनेत्याला आणि पुरोगामी विचारांशी बांधिलकी असणाऱ्या व्यक्तीला मुकलो
जेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने आपण एका अत्यंत श्रेष्ठ अभिनेत्याला आणि पुरोगामी विचारांशी बांधिलकी असणाऱ्या व्यक्तीला मुकलो आहोत. डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली. - जयंत पाटील
जेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने आपण एका अत्यंत श्रेष्ठ अभिनेत्याला आणि पुरोगामी विचारांशी बांधिलकी असणाऱ्या व्यक्तीला मुकलो आहोत.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) December 17, 2019
डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली. #ShriramLagupic.twitter.com/w4uWVCrYe6