‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 13:03 IST2025-05-07T13:01:55+5:302025-05-07T13:03:17+5:30

Operation Sindoor: आम्ही पंतप्रधान मोदी अशी कारवाई कधी करतील याची वाट पाहत होतो आणि त्यांनी योग्य उत्तर दिले आहे, अशा भावना गणबोटे कुटुंबाने व्यक्त केल्या.

pahalgam terror attack victim kaustubh ganbote family reaction over operation sindoor | ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 

‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 

Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तावर कठोर कारवाई करत या हल्ल्याचा बदला घ्यावा, अशी जनभावना होती. पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करून प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणी एअर स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. देशभरातील जनतेने या कारवाईबाबत आनंद व्यक्त करताना पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी आणि मुलाने या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले आहे.

केंद्र सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील अतिरेक्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यानंतर मुझफ्फराबादमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला. बहावलपूरमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला आहे. पाकने ४८ तासांसाठी सर्व हवाई वाहतुकीसाठी हवाई क्षेत्र बंद केले आहे. या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यानंतर या हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबाने प्रतिक्रिया व्यक्त करताना आनंद व्यक्त केला आहे. 

ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान

कौस्तुभ गणबोटे यांचा मुलगा कुणाल गणबोटे यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, आम्ही सर्वजण अशा कारवाईची वाट पाहत होतो आणि आम्हाला केंद्र सरकारकडून ही आशा होती. या कारवाईचे नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ असे आहे आणि मला वाटते की, माझ्या आईसारख्या महिलांचा आदर करण्यासाठी हे नाव देण्यात आले आहे. तसेच सैन्यदलाने केलेली कारवाई योग्य आहे आणि त्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देऊन त्यांनी महिलांचा आदर केला आहे. आम्ही पंतप्रधान मोदी अशी कारवाई कधी करतील याची वाट पाहत होतो आणि त्यांनी त्यांना योग्य उत्तर दिले आहे. दहशतवाद्यांचा खात्मा केला पाहिजे, असे पत्नी संगीता गणबोटे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, नवी दिल्लीत भारतीय सैन्याने पत्रकार परिषद घेत हल्ल्याची सविस्तर माहिती दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानीदहशतवादी तळांवर हल्ले केले. रात्री १ वाजून ०५ मिनिटांपासून ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करण्यात आले. पहलगाम हल्ल्यात झालेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर भारतीय सशस्त्र दलाने हाती घेतले. या ऑपरेशनमध्ये कुठेही निर्दोष नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेतली गेली, असे त्यांनी सांगितले.

 

Web Title: pahalgam terror attack victim kaustubh ganbote family reaction over operation sindoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.