उद्योगांमधील अस्वस्थता घालवण्यासाठी गांधींच्या विचारांकडे वळावे लागेल
By Admin | Updated: April 19, 2017 03:04 IST2017-04-19T03:04:33+5:302017-04-19T03:04:33+5:30
व्यावसायिक आणि समाज या दोन्ही घटकांना समाधानी राहायचे असेल तर उद्योग-व्यवसाय करणाऱ्यांनी मालकाची नव्हे तर विश्वस्ताची भूमिका स्वीकारायला हवी

उद्योगांमधील अस्वस्थता घालवण्यासाठी गांधींच्या विचारांकडे वळावे लागेल
मुंबई : व्यावसायिक आणि समाज या दोन्ही घटकांना समाधानी राहायचे असेल तर उद्योग-व्यवसाय करणाऱ्यांनी मालकाची नव्हे तर विश्वस्ताची भूमिका स्वीकारायला हवी, अशी भूमिका राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मांडली होती. उद्योग जगतातील अस्वस्थता घालवायची असेल तर महात्मा गांधींच्या याच विचारांकडे वळावे लागेल, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी केले.
कॉन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिस (सीएफबीपी)च्या २९ व्या जमनालाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टीस पुरस्कार वितरण सभारंभात ते बोलत होते. चर्चगेट येथील इंडियन मर्चंट चेंबरच्या वालचंद हिराचंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रंमाला राज्याचे ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण, बजाजचे शेखर बजाज, सीएफबीपीच्या अध्यक्षा कल्पना मुन्शी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभू म्हणाले की, जमनालाल बजाज यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे भाग्याचे आहे. हा पुरस्कार ज्यांना मिळाला त्यांची जबाबदारी वाढली आहे. सध्या एखादी वस्तू स्वत:कडे नसल्याचे नागरिकांना दु:ख नसते तर ती वस्तू इतरांकडे आहे हे पाहून माणूस दु:खी होत आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. तरच समाज सुखी व समाधानी होऊ शकेल. त्यासाठी सचोटीने आणि विश्वस्त भावनेने उद्योग करण्याचा मंत्र महात्मा गांधींनी दिला होता. त्याचेच अनुसरण करण्याची आवश्यकता आहे.
निर्मिती, सेवा उद्योग, व्यापार, धमार्दाय संस्था यांच्या सुयोग्य कार्यासाठी जमनालाल बजाज पुरस्कार दिला जातो. ग्राहकांचे समाधान, ग्राहकांशी संवाद, कर्मचा-यांना प्रोत्साहन, पुरवठा श्रृंखला यंत्रणा, पर्यावरणीय संरक्षण, सामाजिक जबाबदारी अशा विविध बाबींचा विजेते निवडताना विचार केला जातो, असे निवड समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांनी सांगितले. (प्रतिनिधी )