घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ

By यदू जोशी | Updated: July 29, 2025 05:30 IST2025-07-29T05:27:54+5:302025-07-29T05:30:30+5:30

निवृत्त महिलांनीही फायदा उचलल्याचा प्रकार उघड; ‘लोकमत’कडे याबाबतची अधिकृत आकडेवारी.

over 9 thousand female government employees took advantage of the ladki bahin scheme a sub scam reveal | घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ

घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लाडकी बहीण योजनेत झालेले एकेक घोटाळे आता समोर येत आहेत. १४ हजारांवर पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे वृत्त ‘लोकमत’ने आधीच दिलेले असताना आता ९,५२६ राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ उचलल्याचे निदर्शनास आले आहे. धक्कादायक म्हणजे, राज्य सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या महिला कर्मचारी एकीकडे निवृत्तीवेतन घेत असताना ‘लाडकी बहीण’चे महिन्याकाठी १,५०० रुपयेही त्यांच्या खात्यात जमा होत होते.

‘लोकमत’कडे याबाबतची अधिकृत आकडेवारी आहे. या योजनेतील पुरुष लाभार्थी शोधताना रेशन कार्डचा आधार सरकारने घेतला होता. आता सरकारी कर्मचाऱ्यांबाबत छाननी करताना सेवार्थ प्रणालीचा आधार घेण्यात आला आणि त्यातून ही गडबड ध्यानात आली. 

मानधनाचा दुहेरी लाभ

पडताळणीमध्ये असेही आढळले की, सरकारी कर्मचारी नसलेल्या ६५ वर्षे वयावरील १३,४६१ महिला अशा आहेत की, ज्यांना इंदिरा गांधी पेन्शन योजनेत आधीच लाभ मिळत आहे. त्यांनी लाडकी बहीण योजनेतूनही पैसे घेतले. महिन्याकाठी २ कोटी याप्रमाणे १० महिन्यांत २० कोटी रुपये त्यांनी घेतले.

त्यांच्यावर कारवाई नाहीच

‘लोकमत’ने ३० मे २०२५ रोजी एक वृत्त दिले होते, ज्यात ‘२,६५२ राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटले’, असे म्हटले होते. अशाप्रकारे या महिलांनी तेव्हा ९ महिन्यांत प्रत्येकी १३,५०० याप्रमाणे ३ कोटी ५८ लाख रुपये नियमबाह्य घेतले होते. मात्र, या महिला कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

‘त्या’ खात्यांत जमा झाले कोट्यवधी रुपये 

निवृत्त झालेल्या १,२३२ महिला कर्मचाऱ्यांच्या खात्यात योजनेचे पैसे आठ ते दहा महिने जमा केले जात होते. याचा अर्थ आतापर्यंत त्यांच्या बँक खात्यात १ कोटी ८५ लाख रुपये जमा झाले. सध्या सेवेत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांची पडताळणी करण्यात आली तेव्हा ८,२९४ जणींनी योजनेचा लाभ उचलल्याचे समोर आले. महिन्याकाठी त्यांच्या बँक खात्यात १ कोटी २४ लाख ४१ हजार रुपये जमा होत होते. आठ ते दहा महिने त्यांना हा फायदा दिला गेला, ही रक्कम १२ कोटी रुपयांच्या घरात आहे. या महिलांपैकी जवळपास सर्व महिला वर्ग तीन वा वर्ग चारच्या कर्मचारी आहेत.

 

Web Title: over 9 thousand female government employees took advantage of the ladki bahin scheme a sub scam reveal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.