'डायल ११२'वर तब्बल १७ लाख कॉल्स; मीरा-भाईंदरमध्ये काही मिनिटांत मदत, मुंबईत २१ मिनिटे
By सोमनाथ खताळ | Updated: March 24, 2025 11:46 IST2025-03-24T11:44:26+5:302025-03-24T11:46:37+5:30
सप्टेंबर २०२१ मध्ये ही हेल्पलाइन सुरू झाली होती

'डायल ११२'वर तब्बल १७ लाख कॉल्स; मीरा-भाईंदरमध्ये काही मिनिटांत मदत, मुंबईत २१ मिनिटे
सोमनाथ खताळ, लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: वेगवेगळ्या अडचणीत सापडलेल्या सामान्य लोकांनी डायल ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर मदतीसाठी कॉल केला. त्यानंतर पोलिस अवघ्या ६.३६ मिनिटांत पोहोचल्याचे समोर आले आहे. मीरा-भाईंदरमध्ये अवघ्या अडीच मिनिटांत पोलिसांनी मदत केली, तर मुंबई शहरात मदतीसाठी पोलिसांना तब्बल २१ मिनिटांचा वेळ लागला आहे. २०२४ या वर्षात १७ लाख २५ हजार लोकांनी कॉल केल्याची नोंद आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये ही हेल्पलाइन सुरू झाली होती. अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात याची ट्रायल घेण्यात आली होती.
प्रत्येक पोलिस ठाण्यात डायल ११२ साठी स्वतंत्र यंत्रणा आहे. एका ठाण्यात किमान ५ ते २० एमडीटी मशीन (मोबाइल डेटा टर्मिनल) आणि दुचाकी, चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. कॉल येताच तक्रारदाराचे लोकेशन लगेच कळते, त्यामुळे हे लोक घटनास्थळी तत्काळ धाव घेतात.
- लहान मुले टाइमपास म्हणून करतात कॉल
काही टवाळखोरांसह लहान मुले हे टाइमपास म्हणून ११२ वर कॉल करून खाेटी माहिती देतात. यापूर्वी बीडमध्ये एका अल्पवयीन मुलाने आजीच्या फोनवरून कॉल करून शाळेत बाॅम्ब असल्याची माहिती दिल्याने यंत्रणेची धावपळ झाली होती.
डायल ११२ ही हेल्पलाइन सामान्यांसाठी खूप आधार देणारी ठरत आहे. कॉल येताच मदतीसाठी आमचे पथक जाते. तक्रार खरी, खोटी हा नंतरचा भाग आहे. आम्ही दुर्लक्ष करत नाही.
-नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड