आमची लढाई कोणत्या व्यक्ती किंवा पक्षाशी नाही तर त्यांच्या विचारधारेशी: खासदार सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 06:00 IST2025-01-06T05:59:10+5:302025-01-06T06:00:30+5:30
साहित्य कला संवादाच्या समारोपावेळी मांडले विचार

आमची लढाई कोणत्या व्यक्ती किंवा पक्षाशी नाही तर त्यांच्या विचारधारेशी: खासदार सुप्रिया सुळे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आमची लढाई कोणत्या व्यक्ती किंवा पक्षाशी नाही तर त्यांच्या विचारधारेशी आहे. त्यामुळे ते आमचे शत्रू नाहीत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी रविवारी केले. कुणाशी वाद झाला तरी चालेल; पण तो अगदी टोकाचा नसावा. दुसऱ्यांचे विचार ऐकण्याची, त्याचे म्हणणे ऐकून घेण्याची ताकद असली पाहिजे. परंतु, आज राजकारणात विचार मोडून टाकण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. तो मोडून काढला पाहिजे, असे खा. सुळे म्हणाल्या.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘विद्वेषाच्या काळात प्रेमाचा उद्गार’ या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या साहित्य कला संवादाच्या समारोपाच्या सत्रात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण निगुडकर, आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या अध्यक्षा नीरजा आणि आंतरभारती कला भवनाचे अध्यक्ष युवराज मोहिते उपस्थित होते.
- आमच्यावर कुणीही टीका केली तर मजा येते. कारण, जेवढी टीका कराल तेवढी आमची मते वाढतात. आमच्याबद्दल ते असे विचार करतात, हे ऐकून मजा येते. कुणाशी भांडण करणे मला आवडत नाही. चर्चेमधून कोणतीही समस्या सुटू शकते. त्यावर मार्ग निघू शकतो. अशावेळी उद्रेक होण्याची वाट का पहावी?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
- तुम्ही प्रभू रामाचे नाव घेता. मी त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते. माझीही त्यांच्यावर प्रचंड श्रद्धा आहे; पण मी जाहीरपणे सांगत नाही. श्रद्धा कुणावरही असावी; पण अंधश्रद्धा असू नये. पंढरपूरच्या पांडुरंगावरही माझे प्रेम आहे; पण त्यासाठी सतत देवळात जाण्याची गरज नाही. तुम्ही जे काही कराल ते अगदी चांगल्या मनाने करा. तो तुमच्या पाठीशी उभा राहतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.