कर्तव्य हीच आमची दिवाळी
By Admin | Updated: November 11, 2015 23:35 IST2015-11-11T21:46:32+5:302015-11-11T23:35:48+5:30
शवविच्छेदनगृहात..‘फायर स्टेशन...’ आमचे कुटुंब’...पोलीस ठाणेच आमचं घर...चालक - वाहकांचा प्रवाशांबरोबर दीपोत्सव

कर्तव्य हीच आमची दिवाळी
आमची दिवाळी शवविच्छेदनगृहात
फटाक्यांची आतषबाजी, सुख-समृद्धीचा दीप प्रज्वलित करणारी पणती, विद्युत रोषणाई अन् आकाशदिव्यांनी सजविलेले घर असे एकीकडे आनंदीमय वातावरण दीपावलीदिवशी सर्वत्र दिसते. मात्र, यादिवशी दुसरीकडे कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) शवविच्छेदनगृहामधील सेवा व कर्तव्य बजावण्यात पोस्टमार्टेम अटेंडर सागर प्रकाश सारंधर व रणजित सुखराम गोहिरे अपडेट असतात.
गेली आठ वर्षे सागर सारंधर व रणजित गोहिरे हे दोघे शवविच्छेदन विभागात कार्यरत आहेत. दीपावलीदिवशी पहाटे अभ्यंगस्नान झाल्यावर आम्ही नवीन कपडे परिधान करतो; पण दोन तासांतच दिवाळीचा आनंद लुटून पुन्हा आम्ही सकाळी
आठ वाजता सरकारी पेशात कामावर हजर राहतो. त्यादिवशी काम करायचे मन नसते; परंतु हा विभागच अत्यावश्यक सेवेत असल्याने आम्हाला कर्तव्य बजावण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. दीपावली सणादिवशी मृतदेहाचे विच्छेदन झाले नाही असा या आठ वर्षांत एकही दिवस नाही. त्यामुळे या सणादिवशी कोणाचा मृत्यू होऊ नये, तो दिवस आमचा भाग्याचा व जीवनातील मोठा क्षण असणार आहे. आम्ही कोणाच्याही मृतदेहाचे विच्छेदन करणार नाही, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने आमची दिवाळी असेल, असे या दोघांनी सांगितले.
‘फायर स्टेशन...’ आमचे कुटुंब’
दिवाळी आम्हीही साजरी करतो; पण ती घरच्यांसोबत नव्हे, फायर स्टेशनमध्ये कर्मचाऱ्यांसोबतच. घरात बनविलेला सर्व फराळ प्रत्येकजण घेऊन आम्ही एकत्रित त्याचा फायर स्टेशनमध्ये आस्वाद घेतो. काहीवेळा फटाक्यांही उडवितो आणि उत्साहाने आनंद साजरा करतो. दिवाळी सणामध्ये फटाके उडताना कोणतीही आगीची दुर्घटना कधी व कोठे घडेल याचा नेम नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वीच चार दिवस आमच्या सर्व रजा सुट्या रद्द झाल्याचा लेखी आदेश दरवर्षी येतो. त्यामुळे सर्वजण वेळेत दक्षतेने कामावर फायर स्टेशनमध्ये उपस्थित राहतात. त्यामुळे घरच्यासोबत दिवाळी साजरी करणे हे दूरच राहते; पण हीच उणीव आम्ही आमच्या फायर स्टेशनमध्येच भरून करतो. आमचा जादा वेळ हा घरापेक्षा फायर स्टेशनमध्येच नेहमी जातो. त्यामुळे आमचे कुटुंब म्हणून आम्ही फायर स्टेशनमधील कर्मचारीच मानतो. आमच्या अंगावर कायमच खाकी गणवेश असतो, त्यामुळे नव्या कपड्याचे आम्हाला नावीन्य वाटतच नाही; पण आमच्या आनंदात त्याची उणीवही भासत नाही. आम्ही याच दिवशी फायर स्टेशनमध्ये एकत्र येऊन नवीन आकाशकंदील लावून फायर फायटरही फुलांनी सजवितो. फायर स्टेशनच्या दारात आम्हीच आकर्षक रांगोळीही काढतो आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करतो. घरच्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचे आमचे नेहमीच स्वप्न राहते, अशीही कैफियत रिलायन्स मॉलच्या पिछाडीस असणाऱ्या फायर स्टेशनमधील स्टेशन अधिकारी मनीष रणभिसे व गणेश लकडे यांनी मांडली. कोल्हापूर महापालिकेच्या सहाही फायर स्टेशनमध्ये हीच कर्मचाऱ्यांची अवस्था आहे.
पोलीस ठाणेच आमचं घर...
दिवाळी...भरभरून कुटुंबात साजरी केली, असा आनंदी क्षण गेल्या वीस-पंचवीस वर्षांच्या सेवेत एकदाही पाहायला मिळाला नाही. येणारा प्रत्येक सण कुटुंबाने साजरा करायचा; परंतु त्यांचा आनंद पाहायला आम्ही मात्र नसतो. ‘पोलीस ठाणेच आमचे घर’ समजून आम्ही दिवाळी साजरी करतो, अशा भावनिक प्रतिक्रिया पोलिसांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
ऊन, वारा, पाऊस यांसह कडाक्याची थंडी सोसत २४ तास सेवा बजाविणाऱ्या खाकी वर्दीतील माणसांचं दुखणं कोणी जाणून घेतं का? वेळेवर जेवण नाही की झोप नाही. स्वास्थ बिघडले असले तरी सांगायचे कुणाला, अशा द्विधावस्थेत काहीवेळा बंदोबस्त करावा लागतो. दिवाळीसह ईद, नाताळ, नववर्षासह संक्रांतीलाही घराकडे जाता येत नाही. त्यामुळे आई-वडिलांसह पत्नी, मुलांचे स्वास्थ्य हरविले आहे. मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष देता येत नाही. कुटुंबातील कोणी आजारी पडले तर त्यांना दवाखान्यापर्यंत घेऊन जाण्यासाठीही वेळ नसतो; परंतु रस्त्यावर पडणाऱ्या अनेकांना मात्र दवाखान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही सर्वांत पुढे असतो. वर्षभर नसेना का; पण दिवाळीला वडील किंवा आई आपल्यासोबत हवी, अशी मुलांची अपेक्षा असते; परंतु त्यांची अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकत नाही, ही खंत मनाला कायम लागून आहे. दिवाळीचे पहिले पाणी घेण्याचे भाग्यही काहीवेळा पदरात पडत नाही. घरा-घरांमध्ये फराळ करण्यामध्ये सर्वजण व्यस्त असतात. आम्ही मात्र पोलीस ठाण्यात. त्यामुळे पोलीस ठाणे हेच आमचे घर समजून आम्ही दिवाळी साजरी करीत असतो. ठाण्यामध्ये लहान-मोठे आकाशकंदील, आकर्षक रांगोळी काढली जाते. ‘लक्ष्मीपूजन’ही केले जाते. ड्यूटीमुळे घरामध्ये जो आनंदा घेता येत नाही, तो आम्ही पोलीस ठाण्यात घेण्याचा प्रयत्न करतो. काही सुटीवर असलेले कर्मचारी दिवाळीचा फराळ पोलीस ठाण्यात घेऊन येतात. तोच फराळ आम्ही आवडीने खात असतो. अशा भावनिक प्रतिक्रिया युवराज आठरे, राहुल देसाई, संगीता गावडे, अजित वाडेकर, सोमनाथ व्हरांबळे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
चालक - वाहकांचा प्रवाशांबरोबर दीपोत्सव
प्रवाशांच्या सेवेसाठी रात्रंदिवस तत्पर असणाऱ्या एस.टी.बसच्या चालक-वाहकांना सेवा करताना दिवाळीचा पहिला दिवस कुठे उगवतो आणि रात्रीचा मुक्काम कुठे मावळतो हेच समजत नाही. आपले भान हरपून जाणाऱ्या या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पहिल्याच दिवशी कुटंबीयांसोबत अभ्यंगस्नान करण्याचा आनंद आणि फराळाचा स्वाद घेण्याची इच्छा असूनही हा सण साजरा करता येत नाही. प्रवाशांच्या आनंदातच आपली दिवाळी मानतात व आपली सेवा बजावत असतात.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात कार्यरत असलेल्या वाहक-चालकांना दीपावलीचा सण कुटुंबीयांसमवेत साजरा करण्याची इच्छा असते. मात्र, हजारो प्रवाशांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुखरूप पोहोचविण्याच्या कामात एस.टी. बसचे वाहक-चालक रस्त्यावरच असतात. त्यांच्या आनंदामध्येच आपली दिवाळी ही भावना डोळ््यापुढे ठेवून ते प्रत्येक सणाला काम करतात, याला दिवाळी अपवाद नसते. अशा कर्मचाऱ्यांना कुटुंबापासून दूर आल्याचे वाटू नये म्हणून प्रत्येक आगाराच्या कर्मचाऱ्यांनी बाहेरच्या आगारातील कर्मचाऱ्यांना अभ्यंगस्नान घालून आपुलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. दीपावलीच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातून आलेल्या वाहक-चालकांना कुटुंबापासून खूप दूर गेल्याचे जाणवू नये यासाठी प्रत्येक आगारातील कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून गेल्या काही वर्षांपासून बाहेरच्या आगारातील वाहक-चालकांना अभ्यंगस्नानाचा कार्यक्रम राबविला जातो. आपल्याच सहकाऱ्यांनी प्रेमापोटी केलेली ही व्यवस्था पाहून चालक-वाहक घरी जाण्याचे दु:ख विसरून प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर राहतात. चालक-वाहक हा ही माणूस आहे. ही भावना समोर ठेवून प्रवाशांनीही सहकार्य केल्यास या सणांचा आनंद अधिकच द्विगणित होईल, असे महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शुभेच्छा संदेश देणारा दूत
अगदी पाच-सात वर्षांपूर्वीपर्यंतचा काळ असा होता की, लोक पोस्टमनची आवर्जून वाट पाहायचे. दिवाळीसह सणावाराच्या शुभेच्छा असो किंवा महत्त्वाचा संदेश, चांगल्या, वाईट अशा सगळ््या घटनांची वार्ता आपल्या पिशवीत घेऊन फिरणारा पोस्टमन हा जणू देवदूतच वाटायचा. आता मोबाईल, व्हॉटसअॅप, मेल या माध्यम क्रांतीने क्षणार्धांत सगळ््यांना संदेश मिळत असले, तरी पोस्टकार्ड आणि पत्रांची मजा काही औरच. आजही अनेक नागरिक पोस्टाद्वारे शुभेच्छा संदेश, ग्रिटिंग, व्यावसायिक, दुकानदार आपली जाहिरात, कंपन्यांचे शुभेच्छा संदेश पाठविले जातात. त्यामुळे दिवाळीत पोस्टमन काकांचे काम अधिकच वाढते. लक्ष्मी पूजनाचा दिवस वगळता सुटी नाहीच. रजाही काढता येत नाही. सकाळी ८ ते संध्याकाळी ५ अशी पोस्टमनच्या कामाची वेळ असते. त्यामुळे सकाळच्या वेळेत कुटुंबीयांना वेळ देणे शक्यच नसते. आपल्या पोटडीतून एक-एक शुभेच्छा संदेशांसह विविध आशयाची पत्रे काढत ती नागरिकांपर्यंत पोहोचविताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंदी भाव आमचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करतात, अशी भावना पोस्टमन कोंडिबा चौधरी यांनी व्यक्त केली. नागरिकांशी सातत्याने येणाऱ्या संपर्कामुळे त्यांच्याशी एक जिव्हाळ््याचे नाते तयार झालेले असते. त्यामुळे दिवाळीची भेट, घरात बोलावून फराळाचा आग्रह, मुलांसाठी काही गिफ्टही दिले जाते. आमची दिवाळी ही अशी सगळ्या नागरिकांसमवेत आणि त्यांच्या आनंदातच साजरी होते.