राज्यातील अनाथ मुलींना समुपदेशन सेवा, सुरक्षितता मिळावी - नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 08:40 PM2023-07-27T20:40:10+5:302023-07-27T20:40:36+5:30
या विषयाबाबत नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या सुचनेच्या दृष्टीने महिला व बालविकास विभागाकडून येथील मुलींसाठी तात्काळ उपाययोजना करण्यात येतील, असे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
मुंबई : बालसंगोपन योजना राज्यातील मुलांपर्यंत व्यवस्थित पोहोचत आहे. परंतु इथे असणाऱ्या मुलींचे वय १२ वर्षांपेक्षा वाढले की मुलीचे आई - वडील लग्न उरकण्याची घाई करतात. विशेषत: अनाथ मुलींचे लग्न अल्प वयात लावण्याची समाजाची प्रवृत्ती आहे. त्यामुळे या मुलींना समुपदेशन, सुरक्षितता मिळते आहे की नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले.
या विषयाबाबत नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या सुचनेच्या दृष्टीने महिला व बालविकास विभागाकडून येथील मुलींसाठी तात्काळ उपाययोजना करण्यात येतील, असे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. आज विधानभवनात प्रश्नोत्तराच्या तासात परिषद सदस्य रमेश कराड यांनी राज्यात कोरोना कालावधीत अनाथ झालेल्या मुलांसाठी बालसंगोपन योजनेअंतर्गत बाल न्याय निधीचे वाटप करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता.
नीलम गोऱ्हेंनी अदिती तटकरेंचे केले कौतुक!
मंत्री अदिती तटकरे यांनी अतिशय चांगले उत्तर दिलेले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये महिला बाल विकास विभागाचे अधिकारी चांगलं काम करत आहेत. विशेषतः सांगली जिल्ह्यात अधिकारी प्रत्येक निराधार व कुटुंबापर्यत पोहोचलेल्या आहेत, असं म्हणत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंत्री महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे व विभागाचे कौतुक केले.