‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 06:13 IST2025-12-23T06:13:04+5:302025-12-23T06:13:19+5:30
पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची सूचना

‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
- यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पालिका निवडणुकीशी प्रत्यक्ष संबंध येतो, ज्यांना विशिष्ट पदावर तीन वर्षांहून अधिक कार्यकाळ झाला आहे, अशा आयपीएस अधिकाऱ्यांची बदली करा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिले आहेत. त्यानुसार या बदल्या केल्या की नाही याचा आढावा दोन दिवसांत आयोग घेणार आहे.
अलिकडेच पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यास सांगितले. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. निवडणूक काळात प्रत्यक्ष फिल्डवर कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्याशी ज्यांचा संबंध येतो, तीन वर्षांपासून जे एकाच पदावर आहेत अशा अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभाग लवकरच काढेल, अशी दाट शक्यता आहे.
नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, मुंबईतील सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण सहपोलिस आयुक्त (प्रशासन) जयकुमार, सहपोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम असे काही आयपीएस अधिकारी आहेत की, त्यांना या पदांवर तीन वर्षांहून अधिकचा कार्यकाळ झाला आहे.
मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होईल, पण अद्याप महापौरपदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. महापालिकेत कोणत्या प्रवर्गातील महापौर असेल हे आरक्षण सोडतीनंतरच स्पष्ट होणार आहे. महापौरांची आरक्षण सोडत ही नगरविकास विभाग काढतो. लवकरच ही कार्यवाही केली जाईल, असे नगरविकास विभागाच्या सूत्रांनी सांगितले. अशी सोडत काढण्याचे निर्देश नगरविकास विभागाला देण्यात आले आहेत.
जि.प.निवडणूक पुढील महिन्यात जाहीर होणार
१२ जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांची निवडणूक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वा १० तारखेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक नाही अशाच या जिल्हा परिषदा असून तेथेच निवडणूक आयोग पहिल्या टप्प्यात निवडणूक घेणार आहे.
महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ तारखेला निकाल जाहीर होतील. त्याच्या आठ दहा दिवस आधी जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम आयोग जाहीर करेल अशी शक्यता आहे.
राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांची नावे सर्वात अगोदर
राष्ट्रीय मान्यताप्राप्त पाच राजकीय पक्षांमध्ये भाजप, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पार्टी व आम आदमी पार्टीचा समावेश आहे.
राज्यस्तरीय पक्षांमध्ये शिंदे सेना, उद्धव सेना, अजित पवार गट, शरद पवार गट व मनसेचा समावेश आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मान्यताप्राप्त इतर राज्यांतील राज्यस्तरीय पक्ष असे - भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (सेक्युलर), समाजवादी पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लिग, एआयडीएमके, जनता दल युनायटेड, एमआयएम, ऑल इंडिया फॉर्वर्ड ब्लॉक, भारत राष्ट्र समिती.
अधिसूचना निघाली
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या मतदानामध्ये ईव्हीएमवर उमेदवारांचा क्रम कसा असेल, याबाबतची अधिसूचना ग्रामविकास विभागाने सोमवारी काढली. महापालिका निवडणुकीतही असाच क्रम असेल, असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.