मौखिक साहित्य क्षणिक असते
By Admin | Updated: March 21, 2015 01:29 IST2015-03-21T01:29:27+5:302015-03-21T01:29:27+5:30
ईशान्येकडील राज्यांमध्ये कथा, गीते आदी साहित्याचा मौखिक माध्यमातूनच अधिक प्रचार झाला. हे साहित्य एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे तोंडीच पोहोचले. त्या तुलनेत लेखी साहित्य कमी प्रचलित झाले

मौखिक साहित्य क्षणिक असते
नाशिक : ईशान्येकडील राज्यांमध्ये कथा, गीते आदी साहित्याचा मौखिक माध्यमातूनच अधिक प्रचार झाला. हे साहित्य एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे तोंडीच पोहोचले. त्या तुलनेत लेखी साहित्य कमी प्रचलित झाले. मौखिक साहित्य महत्त्वाचे असले, तरी ते क्षणिक असते. त्याचा परिणाम अधिक काळ टिकत नाही. याउलट लेखी शब्दाला जास्त किंमत असते; मात्र नेमका त्याचाच अभाव असल्याने ईशान्येकडील राज्यांमधील साहित्य देशभरात पोहोचू शकले नाही, अशी खंत नागालॅँड येथील ज्येष्ठ इंग्रजी साहित्यिक तेमसुला आओ यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे दिला जाणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार तेमसुला आओ यांना ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक अरुण साधू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला़ या वेळी त्या बोलत होत्या़ व्यासपीठावर कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, अहमदाबादच्या ‘इन्फ्लिब्नेट’ केंद्राचे संचालक डॉ. जगदीश अरोरा, उपकुलसचिव पंडित गवळी, कुसुमाग्रज अध्यासनाच्या समन्वयक माधवी धारणकर आदी उपस्थित
होते.
कोणतीही स्थानिक भाषा हा तेथील इतिहास व संस्कृतीचा आरसा असतो. मानवी आयुष्यात माणुसकी, प्रेमाची घुसळण भाषेद्वारे होते. मातृभाषेतून व्यक्त होणे हे संस्कृतिरक्षणाचे माध्यम असले, तरी आपण इंग्रजीतून लिखाण केले. कारण इंग्रजी भाषा हा वैश्विकतेचा पासवर्ड आहे, असे प्रतिपादन आओ यांनी या वेळी केले. मातृभाषेतील लिखाण हे संस्कृतिरक्षणाचे माध्यम आहे आणि स्थानिक भाषा हा तिथल्या लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग असतो. माणुसकी, प्रेम, सामाजिक बांधिलकी या भावना त्यातून व्यक्त होतात. तरीही आपण इंग्रजीत लिखाण केले, कारण साहित्य वैश्विक होण्यासाठी ते गरजेचे होते, असेही त्या म्हणाल्या.
अरुण साधू म्हणाले, पाश्चात्त्य प्रकाशक व वाचकांना केवळ दरिद्री, बकाल भारताचे चित्रण करणारे इंग्रजी साहित्यच आवडते आणि अशाच प्रकारच्या साहित्याला आवर्जून प्रसिद्धी दिली जाते. भारतातील मध्यमवर्गीय समाजाचे चित्रण करणारे साहित्य मात्र नाकारले जाते. भालचंद्र नेमाडे यांनी सलमान रश्दींना उत्तर दिले, हे चांगलेच झाले, असेही ते म्हणाले. याशिवाय देशातील प्रादेशिक भाषांतील आदानप्रदान पूर्णत: थांबले असल्याबद्दल त्यांनी चिंताही व्यक्त केली. (प्रतिनिधी)