ऑपरेशन धनुष्यबाणसह ऑपरेशन टायगर राबवणार; उदय सामंताचा दावा, ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 09:41 IST2025-01-24T09:41:22+5:302025-01-24T09:41:58+5:30
पुढील काही दिवसांत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि पक्षसंघटनेतील अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करून आमच्याकडे प्रवेश करतील, असं सामंत यांनी सांगितलं आहे.

ऑपरेशन धनुष्यबाणसह ऑपरेशन टायगर राबवणार; उदय सामंताचा दावा, ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
Shiv Sena Uday Samant: पक्षफुटीच्या मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष आमने-सामने आले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेत फूट पडून उदय सामंत नवीन गट स्थापन करतील, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता उदय सामंत यांनीही पलटवार केला आहे. पुढील काही दिवसांत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि पक्षसंघटनेतील अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करून आमच्याकडे प्रवेश करतील, असं सामंत यांनी सांगितलं आहे.
"उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे तीन खासदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र तांत्रिक कारणामुळे त्यांचा प्रवेश थांबला आहे. ऑपरेशन धनुष्यबाणसह ऑपरेशन टायगर देखील आम्ही राबवत आहोत. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि माजी आमदार आमच्याकडे येतील. याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यापासून होणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि नंतर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागातील अनेक माजी आमदार आणि पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करतील," असा दावा उदय सामंत यांनी केला आहे.
दरम्यान, "आम्ही फोडोफोडीचा प्रयत्न करत नाही. मात्र संघटनात्मक आणि विकासात्मक ताकद नेतृत्वाकडून दिली जात नसल्यानेच उद्धव ठाकरेंच्या पक्षातील खासदार आणि इतर पदाधिकारी आमच्याकडे येण्यासाठी उत्सुक आहेत," असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
"माझ्यात आणि एकनाथ शिंदेंमध्ये फूट पडू शकत नाही"
"बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत चांगली भूमिका मांडतील, त्यांचे समर्थन आम्ही करणार आहोत. ज्यांचा राजकीय अस्त झाला आहे, ते माझ्या नावाचा वापर करत आहेत. असल्या बालिश पद्धतीने माझ्यात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोणीही फूट पाडू शकत नाहीत. दावोसला असताना ज्या लोकांनी माझ्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले, माझा राजकीय अस्त व्हावा, यासाठी प्रयत्न केले त्यांच्याबाबत मी एवढेच सांगू इच्छितो की, ते स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहे. वारंवार त्यांना फोन करत आहेत. कालही कॉल केला होता. आमचे आता पुढे राजकीय भवितव्य काय असेल, असे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारले," असा गौप्यस्फोटही उदय सामंत यांनी केला.