Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्धवस्त केले. आता या ऑपरेशनची माहिती जगाला देण्यासाठी आणि पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी केंद्र सरकारचे शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर जाणार आहे. या शिष्टमंडळात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचाही समावेश करण्यात आला आहे.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि शिवसेना यूबीटी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी फोनवर चर्चा झाली. या चर्चेनंतर उद्धव ठाकरेंनी शिष्टमंडळात सामील होण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेने एक निवेदन जारी केले असून, त्यात खासदार प्रियंका चतुर्वेदी पक्षाच्या वतीने या शिष्टमंडळाचा भाग असतील, असे सांगितले आहे.
शिवसेनेने म्हटले की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत, विशेषतः पाक-आधारित दहशतवादाविरुद्ध आणि त्यांचे पायाभूत सुविधा आणि तळ नष्ट करण्यासाठी पंतप्रधानांना पाठिंबा दर्शविला आहे. दहशतवादाविरुद्ध कारवाईमध्ये आपण सर्वजण एक आहोत, याबद्दल कोणतेही दुमत असू नये. हे शिष्टमंडळ राजकारणाबद्दल नाही, तर दहशतवादाविरुद्ध भारताच्या भूमिकेबद्दल आहे. याबद्दल खात्री असल्याने आम्ही सरकारला आश्वासन दिले की, या शिष्टमंडळाद्वारे आम्ही देशासाठी जे योग्य आणि आवश्यक आहे ते करू.
दहशतवादाविरुद्ध काम करणाऱ्या सशस्त्र दलांसोबत आपण सर्वजण एक आहोत यात शंका नाही. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना, शिवसेनेने असेही म्हटले की, पहलगाममधील राजनैतिक परिस्थिती आणि अयशस्वी गुप्तचर/सुरक्षा प्रणालीबद्दल आमचे स्वतःचे मत आहे आणि आम्ही आमच्या देशाच्या हितासाठी आमच्या देशात प्रश्न विचारत राहू. पण, पाकिस्तान आधारित दहशतवादाचा पर्दाफाश करण्यासाठी आपण जागतिक स्तरावर एकत्र आले पाहिजे, जेणेकरुन तो नष्ट करता येईल, असेही शिवसेनेने म्हटले.
ममता बॅनर्जींचाही होकारकिरण रिजिजू यांनी सोमवारी तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांच्याशीही चर्चा केली. यानंतर पक्षाने या शिष्टमंडळात डायमंड हार्बरचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना पाठवण्यास सहमती दर्शविली. यापूर्वी, तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांना शिष्टमंडळात सामील होण्याची संधी देण्यात आली होती. परंतु खासदार युसूफ पठाण यांनी शिष्टमंडळात सामील होण्यास नकार दिला होता.