‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:34 IST2025-11-18T16:33:07+5:302025-11-18T16:34:19+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजप नेत्यांकडून शिंदे गटाचे नगरसेवक आणि पदाधिकारी आपल्या पक्षात घेतले जात असल्याने शिंदे गटाचे काही मंत्री कमालीचे नाराज होते.

‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
जसजशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ लागल्यात तशा महायुतीतील अंतर्गत धुसफूस आता शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे. भारतीय जनता पक्षाकडून होत असलेल्या 'ऑपरेशन लोटस'मुळे नाराज झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच खडसावल्याची मोठी बातमी समोर येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजप नेत्यांकडून शिंदे गटाचे नगरसेवक आणि पदाधिकारी आपल्या पक्षात घेतले जात असल्याने शिंदे गटाचे काही मंत्री कमालीचे नाराज होते. या नाराजीतूनच आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातला होता. या बैठकीनंतर गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले यांसारखे नेते आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी फडणवीस यांच्या दालनात पोहोचले होते.
पुराव्यासह झाड झाड झाडलं!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या मंत्र्यांनी कल्याण-डोंबिवलीतील भाजपच्या पक्षप्रवेशावर आक्षेप घेत, "तुम्ही जे करत आहात, ते युतीच्या धर्माला धरून नाही," अशी तक्रार केली. यावेळी, शिंदे स्वतः उपस्थित होते. या आरोपांना उत्तर देताना, देवेंद्र फडणवीस यांनी थेट आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी केवळ मंत्र्यांचे आरोप फेटाळले नाहीत, तर त्यांनी लगेचच आपल्याकडे असलेल्या पुराव्यांची यादी वाचून दाखवली. तुम्ही केवळ तक्रार करत आहात, पण उल्हासनगरसह अनेक ठिकाणी तुमच्या गटाकडूनही अशाच प्रकारे पक्षप्रवेश केले जात आहेत, असे त्यांनी थेट सांगितले. सुरुवात तुम्हीच केली आहे, त्याचे प्रत्तूतर तुम्हाला दुसरीकडे मिळू लागले आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी या मंत्र्यांना झाडले आहे.
फडणवीसांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अलीकडे झालेल्या राजकीय प्रवेशांची यादी वाचून दाखवल्याने, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोरच या नाराज मंत्र्यांची मोठी कोंडी झाली. युतीचा धर्म पाळला जात नसल्याची मंत्र्यांची तक्रार होती, मात्र फडणवीसांनी त्याच "युती धर्माचा" मुद्दा उपस्थित करत त्यांना शांत केले. यामुळे, मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून आलेले हे मंत्री आणखीनच अडचणीत सापडले.