'फडणवीस सरकारच्या काळात केवळ आश्वासनांचा पूर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 13:16 IST2019-12-16T13:15:04+5:302019-12-16T13:16:01+5:30
फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या काळात मंत्र्यांनी केवळ आश्वासने दिले असून आश्वासनांची पूर्तता झाली नाही. याकडे आपण लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले.

'फडणवीस सरकारच्या काळात केवळ आश्वासनांचा पूर'
मुंबई - राज्यात स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार आपल्या पहिल्या अधिवेशनाला सामोरे जाणार आहे. विरोधक आक्रमक असून विरोधात बसलेला भारतीय जनता पक्ष सत्ताधाऱ्यांना अधिवेशन काळात सळो की पळो करून सोडणार अस दिसत आहे. मात्र त्याआधीच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपच्या सत्तेच्या काळातील कारभारावर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात विधीमंडळातील मंत्र्यांनी केवळ घोषणा केल्या. या घोषणा दिल्यानंतर अंमलबजावणीच्या बाबतीत बोंब होती, अस पटोले यांनी म्हटले आहे. नाना पटोले विधानसभेचे नवे अध्यक्ष असून या संदर्भात आपण सचिवांना जाब विचारणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
विधीमंडळात मंत्री जबाबदारीने बोलत असतात. येथे त्यांनी दिलेली आश्वासने पाळली जातील असे संकेत असतात. या आश्वासनाचा पाठपुरावा करून अंमलबजावणी सचिवांनी करायला हवी असते. मात्र फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या काळात मंत्र्यांनी केवळ आश्वासने दिले असून आश्वासनांची पूर्तता झाली नाही. याकडे आपण लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले.