‘समृद्धी’ मार्गाचे काम उरले फक्त 45 किमी; शिर्डीपर्यंतचा ४८५ किलोमीटरचा टप्पा पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 06:26 IST2021-12-31T06:26:08+5:302021-12-31T06:26:36+5:30
Samruddhi highway : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यांतील काही मोठ्या पुलांचे काम येत्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करता येणार नाही.

‘समृद्धी’ मार्गाचे काम उरले फक्त 45 किमी; शिर्डीपर्यंतचा ४८५ किलोमीटरचा टप्पा पूर्ण
- आशिष रॉय
नागपूर : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचे शिर्डीपर्यंतचे काम येत्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या टप्प्यातील केवळ ४५ किलोमीटरचे काम बाकी राहिले आहे. हा ५३० किलोमीटरचा टप्पा आहे.
या टप्प्याचे काम मे-२०२१ पर्यंत पूर्ण करायचे होते; परंतु कोरोनामुळे डेडलाइन पाळता आली नाही. संपूर्ण महामार्ग डिसेंबर-२०२२ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड
यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यांतील काही मोठ्या पुलांचे काम येत्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करता येणार नाही.
त्यामुळे वाहनचालकांना अशा ठिकाणी वळण घेऊन पुढे जावे लागेल. पुलांचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी चार-पाच महिने वेळ लागेल. या टप्प्यामध्ये असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव टनेलचे काम पूर्ण झाले आहे.
हा ५५ हजार ३२२ कोटीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या आठ पदरी महामार्गाची रुंदी २२.५ मीटर आहे. महामार्गाची उंची ४ ते १२ मीटरपर्यंत राहणार आहे, तसेच महामार्गाला संरक्षक भिंत बांधली जाईल. त्यामुळे जनावरे व पादचाऱ्यांना रोडवर येता येणार नाही. महामार्गावर कमाल १५० किलोमीटर प्रती तास वेगाने वाहन चालवता येईल. त्यामुळे नागपूर- मुंबई हे ७०१ किलोमीटर अंतर केवळ ८ तासांत, तर नागपूर- औरंगाबाद अंतर ४ तासांत पूर्ण करता येईल. परिणामी, विदर्भ व मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल.
अशी आहेत वैशिष्ट्ये
हा महामार्ग दिल्ली- मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर, दी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, वर्धा व जालना येथील ड्राय पोर्टस् आणि मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या औद्योगिक क्षेत्रांना एकमेकांशी जोडणार आहे.
महामार्गावर १७ गृहप्रकल्पही उभारले जाणार आहेत. त्यापैकी ९ प्रकल्प विदर्भात आहेत. एक नागपूरजवळ आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड राहणार आहेत. ते अंडरपासेसने जुळलेले राहतील.
सीसीटीव्ही कॅमेरे व प्रत्येकी पाच किलोमीटरवर मोफत टेलिफोन बूथ राहतील. ऑप्टिक फायबर केबल, गॅस पाइपलाइन, वीज लाइन इत्यादीसाठी विशेष जागा सोडली जाईल. महामार्गावर येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी २५ मार्ग राहतील.